आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bamboo Made 'eco friendly' Rakhi Is Identity Of Melghat

बांबूच्या ‘इको-फ्रेंडली’ राख्या मेळघाटाची ओळख!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - प्लास्टिक व रासायनिक रंगांचा वापर टाळून बांबूपासून इको-फ्रेंडली कलात्मक आणि दिसायला अत्यंत आकर्षक राख्या तयार होत आहेत. मागील दोन वर्षे या राख्या खास मेळघाटाची ओळख व आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे एक साधन बनल्या आहेत. भयावह कुपोषण अशी मेळघाटाची नकारात्मक ओळख मिटवण्याचे काम हा राखी प्रकल्प करत आहे. पारंपरिक कलांना वाव देऊन रोजगार देण्याचे प्रयत्न होत आहेत.

मेळघाटातील लवादा या गावाचे संपूर्ण बांबू केंद्र २० वर्षांपासून बांबूचा वापर करून तयार होणाऱ्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रशिक्षण, संशोधन तसेच डिझाइन विकास केंद्र म्हणून कार्यरत आहे. नागपुरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट विनू काळे आणि सुनील देशपांडे यांनी आदिवासींना रोजगारक्षम बनवण्याच्या हेतूने केंद्र काढले. केंद्राने आजवर परिसरातील चार हजारांवर लोकांना बास हस्तशिल्प, बास ज्वेलरी, फर्निचर, गृहनिर्माण, बास प्लांटेशन या विषयाचे प्रशिक्षण दिले आहे. या केंद्राच्या मार्गदर्शनात वस्तूंचे उत्पादन आणि विक्री वेणुशिल्पी औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत होते. कोरकू, गोंड, भिलाला या अदिवासींसह पारंपरिक बांबू कारागीर बुरूड समाजाचे लोक या संस्थेचे सदस्य आहेत. वेणुशिल्पी संस्थेकडून बांबूच्या दोनशेवर वस्तूंची निर्मिती केली जाते. त्यापैकी राखी ही एक वस्तू आहे. सृष्टिबंध या ब्रँडने ओळखल्या जाणाऱ्या या राख्या मुंबई, पुणे, नाशिकसह काही निवडक शहरांत सध्या पोहोचवल्या जात आहेत.

राख्या खऱ्या अर्थाने नैसर्गिक आहेत. बांबू कापून तयार केलेल्या पट्ट्या, हँडमेड पेपर, प्राकृतिक व खाण्याचा रंग, लाकडाचे मणी, धागा तसेच झाडांच्या बिया या वस्तूंचा वापर करून त्या तयार होतात. संस्थेच्या सदस्यांना कच्चा माल पुरवून राख्या तयार करून घेतल्या जातात. राख्यांचे जवळपास तीस विविध डिझाइन्स संस्थेने विकसित केले आहेत. बाजारातील राख्या स्वस्त असल्या तरी या चिनी राख्या पर्यावरणाला हानी पोहोचवतात. नागरिकांनी पर्यावरणासह देशाच्या अर्थकारणाचा विचार करावा, आदिवासींना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन देशपांडे करतात.
३ महिने रोजगार
राख्या निर्मितीतून दीडशे लोकांना घरबसल्या तीन महिन्यांचा मिळताे. निर्मितीत महिला आणि अपंग जास्त अाहेत. एका राखीची किंमत १५ ते ४० रुपये अाहे. हे यासाठी लागणाऱ्या परिश्रमांचे मूल्य अाहे. नवे वृक्ष फुलवणार राख्यांमध्ये चंदन अथवा इतर फुलझाडांच्या बिया वापरल्या जातात. त्यामुळे वापर झाल्यावर त्या मातीत फेकून दिल्या तरी त्या नवे वृक्ष फुलवण्यास सार्थकी ठरतील, असे सुनील देशपांडे सांगतात.
कुठे मिळतात बांबूच्या राख्या?
पुणे : ज्ञानप्रबोधिनी, सेवा सहयोग.
मुंबई : दक्षता मंच, इस्कॉन.
नाशिक : एमबीए महाविद्यालय.
अमरावती : प्रयास, सेवांकुर, आनंदमन,
यवतमाळ : दीनदयाळ बहुद्देशीय संस्था
नागपूर : अलग अँगल