आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘श्रीरामभक्त’ पुरोहितांना मिळाले श्रद्धा, सबुरीचे फळ; आसामच्या राज्यपाल पदावर संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपचे नागपुरातील ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांची तब्बल दोन दशकांपासूनची राजकीय पुनर्वसनाची प्रतीक्षा अखेर संपली. संघ नेतृत्वासह पक्षावर बाळगलेली श्रद्धा व सबुरीचे फळ म्हणूनच त्यांना आसामच्या राज्यपाल पदावर संधी मिळाल्याची नागपुरात चर्चा
आहे.

मागील दोन दशकांपासून पुरोहित राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. त्यांना राज्यसभेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, नागपुरातीलच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास महात्मेंची राज्यसभेवर वर्णी लागल्यावर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर पुरोहितांना राज्यपाल म्हणून संधी मिळणार असल्याचे संकेत होते अन् बुधवारी त्यावर शिक्कामाेर्तब झाले.

राम मंदिराच्या लाटेत भाजपवासी झालेल्या पुरोहितांनी संघ नेतृत्वाचा विश्वास संपादन केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना राजकीय गुरु मानतात तर काही काळापुरत्या रंगलेल्या विसंवादानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही त्यांनी अखेर जुळवून घेतले हाेते. विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या माध्यमातून राजकीय इनिंग सुरु करणाऱ्या विदर्भवादी पुरोहितांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने नंतर काँग्रेस पक्षात बहरली. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांना प्रथमच राज्यमंत्रीपद त्यांना मिळाले. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा नागपूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केल्यावर पुरोहितांनी राम मंदिराच्या मुद्यावर पक्षाची फारकत घेऊन भाजपला जवळ केले. राम मंदिराच्या लाटेत त्यांच्या रुपाने भाजपला प्रथमच नागपूर लोकसभा मतदारसंघावर ताबा मिळाला. मात्र १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकिट नाकारल्यावर नाराज पुरोहितांनी भाजपला रामराम ठोकला.

युती शासनाच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावर आरोप करण्यात पुरोहित आघाडीवर होते. गडकरी यांनी नागपुरात बांधलेल्या सिमेंट रस्त्यांच्या विरोधात पुरोहितांनी मोठी मोहिमच उघडली होती. विदर्भ राज्य पार्टीच्या माध्यमातून नव्याने राजकीय इनिंग सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न सपशेल फसला. त्यानंतर काही काळ राजकीय विजनवासात राहिलेल्या पुरोहितांनी सन २००९ मध्ये पुन्हा भाजपला जवळ केले. त्यानंतर मात्र गडकरींसह साऱ्याच भाजप नेत्यांशी त्यांनी जुळवून घेतले. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यावर पुरोहितांना राजकीय पुनर्वसनाची प्रतीक्षा होती. अखेर आसामच्या राज्यपालपदी नियुक्तीने ती संपुष्टात आली.

संघ नेत्यांचे आशीर्वाद
पुरोहितांच्या नियुक्तीच्या वृत्तानंतर नागपुरातील भाजपच्या झाडून साऱ्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पुराेहितांच्या मालकीच्या ‘दैनिक हितवाद’ कार्यालयात गर्दी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या. सायंकाळी पुरोहितांनी संघ मुख्यालय गाठत सरसंघचालक भागवत व सरकार्यवाह जोशी यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.

नागपुरातून दुसरे राज्यपाल
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात त्यांच्या नागपुरातील सहकारी रजनी राय यांना पाँडिचेरीचे नायब राज्यपाल होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुरोहित हे राज्यपालपदी संधी मिळणारे दुसरे नागपूरकर आहेत.
(फाइल फोटो : नितीन गडकरींसाेबत पुराेहित.)
बातम्या आणखी आहेत...