आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबूराव अाडसकरांनी हट्टाने पूर्ण केला विदेश दाैरा, आदराजंली वाहताना नेत्यांनी जागवल्या आठवणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बीड जिल्ह्यातील माजी अामदार बाबूराव अाडसकर यांना विधानसभेत अादरांजली वाहताना सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी त्यांच्या अाठवणी सांगितल्या. सभागृहनेते या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर काहींची भाषणं झाली. आडसकर हे अस्सल रांगडं, ग्रामीण व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आकडेबाज मिशा, स्वभाव, आठवणी ही वर्णनं झाली. “बाबूरावांची एका सरकारी परदेश दौऱ्यासाठी निवड झाली होती. ही निवड झाली म्हणून दौऱ्यावर जाण्याआधी सहा महिने बीड जिल्ह्यात त्यांचे सत्कार चालू होते. जाऊन आल्यावर पुढेही सहा महिने त्यांचे सत्कार जिल्ह्यात रंगले,’ अशी अाठवण एका ज्येष्ठ अामदाराने सांगितली.
राजकारणात स्वतःच मार्केटिंग स्वत:लाच करावं लागतं, हे बाबूरावांना चांगलंच माहिती होतं. याच प्रसंगाशी निगडित आणखी किस्सा राधाकृष्ण विखे यांनी सांगितला. “परदेश दौऱ्यासाठी बाबूराव गावातून निघाले तेव्हा गावाजवळच्या अाेढ्याला पूर आला होता. पुरामुळं परदेशवारी हुकणार का? अशी काळजी बाबूरावांना लागली. गाडी अडली तेव्हा बाबुरावांनी चक्क ट्रकमध्ये त्यांची गाडी घालून ओढा पार केला. खटाटोप करून मुंबईत पोचले तर सरकारी अधिकाऱ्यांनी संबंधित दौराच रद्द झाल्याचं सांगितलं. हे अधिकारी होते आताचे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील. तेव्हा बाबूराव म्हणाले, ‘असं कसं चालेल? मी जिल्ह्यातून सत्कार घेऊन आलोय. मला जावंच लागेल.’ बरीच हिकमत लढवून शेवटी बाबुरावांनी रद्द झालेल्या दौऱ्याला सरकारी मान्यता मिळवलीच आणि ते एकदाचे परदेशी गेलेच, अशी अाठवण विखेंनी सांगितली. अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असतानाही ते राज्य, बीड जिल्ह्यातील राजकारणाची खडान्खडा माहिती घ्यायचे. मात्र मुलाच्या निधनानंतर ते खचले अाणि त्यातच त्यांची अखेर झाली, अशी भावूक अाठवणही काही सदस्यांनी सांगितली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही अाठवणी सांगितल्या. ‘अाडसकरांशी अामचे घरगुती संबंध हाेते. त्यांची भाषणे एेकूनच अाम्ही माेठे झाल्याचे त्यांनी सांगितले.

थेट अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घ्यायचे
विधान परिषदेत विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही अाडसकरांच्या अाठवणी जागवल्या. ‘पवार साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून अाडसकरांची अाेळख हाेती. नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे, राजकारण व समाजकारणाची अपडेट माहिती ठेवणारे म्हणून त्यांची ख्याती हाेती. तीन दशकांपासून त्यांची विविध क्षेत्रांत हुकूमत हाेती. ‘हबाडा’हा त्यांचा शब्द खूपच गाजला. एकाही निवडणुकीतील त्यांचं भाषण या शब्दाशिवाय पूर्ण हाेत नव्हतं.’ अमरसिंह पंडित म्हणाले, ‘अाडसकरांना बीडच्या राजकारणाची खडानखडा माहिती हाेती. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांना ते थेट फाेन करून कामांची माहिती घ्यायचे.
बातम्या आणखी आहेत...