अमरावती - अमरावती शहरातील बेलोरा विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून, सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी १३०० मीपासून १८०० मीपर्यंत वाढवली जाणार आहे. तसेच एटीआर स्वरूपाची ७२ आसनी विमाने येथे उतरणार आहेत. एवढेच नव्हे, तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोय होणार असल्यामुळे अमरावती येथून मोठ्या शहरात आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी विशेष सोय होणार आहे. सध्या अमरावतीहून कोणत्याही मोठ्या शहरात जाण्यासाठी नागपूर विमानतळावर जावे लागते. त्यामुळे पैसे, वेळ वाया जातो. यापासून लवकरच अमरावतीकरांची सुटका होणार आहे.
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ एप्रिल रोजी संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक कामांना गती देण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
राज्य विधानमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीचा २२ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्ह्यातील बेलोरा विमानतळ, चिखलदरा पर्यटनस्थळ विकास महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पांसंदर्भात दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात समितीद्वारे बेलोरा विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. या विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात समितीप्रमुख आ. डाॅ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विमानतळ विस्तारीकरणासंबंधात सद्य:स्थिती आवश्यक कारवाई याबाबत चर्चा झाली. बेलोरा विमानतळ विकसित करण्यासाठी समितीने घेतलेल्या मनिर्णयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आ. डाॅ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ११ मार्च रोजी पत्र पाठवून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून मुख्यमंत्र्यांनी १२ एप्रिल रोजी बैठक घेतली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, अमरावतीचे आ. डाॅ. सुनील देशमुख, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम, प्रधान सचिव (ऊर्जा), प्रधान सचिव पाणीपुरवठा, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, एअर इंडिया कंपनीचे अधिकारी, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते, अमरावतीचे सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता, अमरावतीचे मजीप्रा मुख्य अभियंता, महाट्रान्सको मुख्य अभियंता हे अधिकारी उपस्थित होते.
विस्तारीकरणासाठी तातडीने निधी देणार : बैठकीतमुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती यावी म्हणून तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन बैठकीत दिले. त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढणार असून, जास्तीत जास्त संख्येत प्रवाशांना अमरावतीहून मोठ्या शहरांमध्ये जाता येईल. विशेष बाब अशी की, सध्या एटीआर ७२ आसनी विमानांची उड्डाणे लवकरात लवकर सुरू करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
लवकरच विमानसेवा सुरू होईल
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे कामे पूर्ण होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लवकरात लवकर येथून विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास अमरावतीचे आमदार डाॅ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
विस्तारीकरणाचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी पाणीपुरवठा योजना, उच्च दाब विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण, अस्तित्वातील पाॅवर स्टेशनमध्ये परिवर्तन करून याचा विस्तार या कामांना प्रशासकीय अन् वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला १.६५ कोटी (पाण्याच्या पाइपलाइनसाठी) महावितरणला ११.२४ कोटी रु. रक्कम विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहेत. दोन्ही कामांची निविदा प्रक्रिया संबंधित विभागाने सुरू केल्याचे अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन पी. एस. मीणा यांनी बैठकीत सांगितले.
मजीप्रा महावितरणला दिला कामांसाठी निधी
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकर सुरू करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.