आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी मंत्रालयात झाला राज्यात सर्वाधिक अपहार, दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यात सर्वाधिक अनियमितता अमरावती जिल्हा परिषदमध्ये आढळून आली असून, बांधकाम पोषण आहार योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याचे आढळून आल्याचे पंचायत राज समितीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी गुरुवार, नोव्हेंबर रोजी सांगितले.
पंचायत राज समितीच्या सदस्यांचे गुरुवारी शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. आमदार डॉ. सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळेसह पदाधिकाऱ्यांनी समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकरसह अन्य सदस्यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदनही पाटील यांना दिले. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात बैठक सुरू झाली. बैठकीत २००८-०९ २०११-१२ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालाची तपासणी समितीकडून करण्यात आली. दुपारी अडीच वाजताच्या मध्यान्हानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, राज्यातून सर्वाधिक अनियमितता अमरावती जिल्हा परिषदेमध्ये निदर्शनास आली आहे. बांधकाम पोषण आहार योजनेत सर्वाधिक घोटाळा असल्याची बाब समितीच्या चौकशीत स्पष्ट झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारसारख्या योजनेत अनियमितता होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत संबंधित दोषींवर फौजदारी, कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

आजपंचायत समित्यांची झडती : पंचायतराज समितीचे विविध पथके उद्या जिल्ह्यातील पंचायत समित्या, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाड्यांना भेट देणार आहेत. यात जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांचा समावेश असून, सकाळी नऊ वाजतापासून या भेटी सुरू होणार आहेत.

सेवानिवृत्त,निलंबितही हजर : पंचायतराज समितीच्या आजच्या सुनावणीसाठी सेवानिवृत्त, निलंबित अधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. समितीच्या सुनावणीत कोणाचा नंबर येईल, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या दिसून आल्या. अनेक अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर कारवाईची भीतीही दिसून येत होती.

जि.प. पदाधिकाऱ्यांनी मांडल्या समस्या : पंचायतराज समितीचे अध्यक्ष संभाजी निलंगेकर पाटील यांची जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या तक्रारी मांडल्या. उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून, रुग्णवाहिकेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ममता भांबुरकर यांनी बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांच्या निकृष्ट बांधकामाबाबत तक्रार मांडली. कापूसतळणी-खिरगव्हाण रस्त्याच्या झालेले निकृष्ट बांधकामही पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. मनोहर सुने यांनी शिरजगाव कसबा-थूगाव, करजगाव-लाखनवाडी या वर्षभरापूर्वी बांधकाम करण्यात आलेला रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असल्याची तक्रार पाटील यांच्याकडे केली. याबाबत कार्यकारी अभियंत्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नसल्याचे सुने यांनी तक्रारीत म्हटले.
मजुरांचे संभाजी पाटील यांना निवेदन : जिल्हापरिषद कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या घरचे इलेक्ट्रीकचे काम केल्यानंतर अभियंता श्री. पोपळी यांनी पाच वर्षानंतरही २२ हजार रुपयांचे बिल दिल्याची तक्रार रवींद्र चव्हाण यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना दिली.
चव्हाण यांनी २०१० मध्ये जिल्हा परिषद विविध अधिकाऱ्यांच्या निवासात इलेक्ट्रिकची कामे केली होती. त्याची व्याजासह आज ४,७५०० रुपये रक्कम झाल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी चव्हाण यांनी छातीवर मागणीचे निवेदन चिकटवून अनोखे आंदोलन केले.

४५दिवसांत होणार दोषींवर कारवाई
पंचायतराज समितीच्या निदर्शनास आलेल्या अनियमितच्या चौकशी अहवाल ४५ दिवसांत विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. संभाजी पाटील निलंगेकर, पंचायत राज समितीप्रमुख.

बैठकीमध्ये फक्त विभागप्रमुख हजर
पंचायतराज समितीच्या बैठकीत सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. त्यामुळे उर्वरित पंचायत समितीचे अधिकारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या परिसरात गर्दी करून होते. समितीच्या भेटीमुळे आज दिवसभर जिल्हा परिषदेत अधिकारी पदाधिकाऱ्यांची गजबज दिसून आली.

अधिकाऱ्यांनी गजबजली जिल्हा परिषद
पंचायतराज समितीची आज प्रमुख बैठक होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी परिसरात सकाळपासून हजर होते. सर्वत्र अधिकाऱ्यांची गजबज दिसून येत होती. समितीची गाज नेमकी कोणावर कोसळते, याबाबतची भीतीही अनेक अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होती.
बातम्या आणखी आहेत...