आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध प्रजातीच्या पक्ष्यांची होणार ऑनलाइन गणना, पक्षीमित्रांना संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशभरात कोणकोणच्या प्रजातींचे पक्षी आहेत, नवीन पक्षांची ओळख काय, पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये काही वाढ आहे, अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता जागतिक पातळीवर आयोजित होणारा ‘ग्रेेट ब्याकयार्ड बर्ड काउंट’  यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.  या चार दिवसात भारतातून हजाराहून जास्त पक्षीनिरीक्षिक  या पक्षीनिरीक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. 
 
देशाच्या कान्याकोपऱ्यातून अनेक ठिकाणांहून हजारो पक्षी प्रजातींची नोंद हे पक्षीनिरीक्षक घेणार आहेत.  मागील वर्षी भारतातील ११०५ पक्षी निरीक्षकांनी ७९०८ पक्षी सुचींची ऑनलाईन नोंदणी करून जगात तिसरे स्थान प्राप्त केले होते. तर याच माध्यमातून ७८५ पक्षी प्रजातींची झालेली नोंद ही संख्येच्या दृष्टीने प्रथम ठरली होती. या वर्षी सुद्धा भारतातील पक्षी निरीक्षकांनी या उपक्रमात मोठ्या संखेत सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात व भारतातील कानाकोपऱ्यातून सहभाग नोंदवावा यासाठी बर्ड काउंट इंडिया च्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे अश्या शैक्षणिक व इतर संस्थांचा सहभाग नोंदविण्यासाठी कॅम्पस बर्ड काउंट’  हा आणखी एक नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचा यामध्ये सहभाग असून, यामध्ये गतवर्षी १९ राज्यांमधून जवळपास १४० संस्थांनी सहभाग नोंदविला होता. पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद असला तरी त्याला दुसरी बाजू ही शास्त्रीय ज्ञानाची आहे. 

लोक विज्ञानावर  आधारित या कार्यक्रमामधून गोळा होणारी माहिती ही पक्ष्यांबद्दलचे अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. पक्ष्यांच्या कोणत्या प्रजाती भारतात कुठे कुठे आढळतात व किती संख्येत आढळतात, कोणत्या प्रजातीची संख्या कमी होत आहे किंवा वाढत आहे ? त्यांच्या अधिवासात काही बदल वा हस्तक्षेप होत आहेत का किंवा यामध्ये दरवर्षी काय बदल होत आहेत, अशी उपयुक्त माहिती यातून मिळणार आहे.  तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असणाऱ्या पक्ष्यांविषयीची माहिती मिळण्यास पक्षीनिरीक्षणादरम्यान मदत होणार आहे. पक्षी निरीक्षकांनी या उपक्रमात सहभागी होऊन अनेक भागातून पक्षी नोंदी कराव्यात व मागील वर्षीप्रमाणे आपल्या देशाचा क्रमांक अव्वल राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी केले आहे.
 
पक्षीनिरीक्षणास हे करा
पक्षी हे कुठेही असतात, त्यासाठी पक्षी अभयारण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नसते. अगदी घराच्या अंगणापासून पक्षी आढळत असतात. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण दि. १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान आपल्या घराच्या अंगणात, शेतात, शाळेच्या आवारात, जवळच्या तलावावर, जंगलात, गवताळ माळरानावर, बगीच्यात अश्या कुठेही, आपणास शक्य असेल तेथे कमीत कमी १५ मिनिटे पक्षी निरीक्षण करून पक्ष्यांच्या संख्येसह आपली यादी करावी व हि यादी ई–बर्ड (eBird) या संकेतस्थळवर अपलोड करावी. आपल्या महाविद्यालयाच्या परिसरातील पक्ष्यांची नोंदणी करावयाची असल्यास दि. १७ पूर्वी www.birdcount.in या संकेतस्थळावर प्रथम आपल्या Campus ची नावानिशी नोंदणी करून त्यानंतर तेथील नोंदी नोंदवाव्यात. आपल्या देशाचा क्रमांक अव्वल राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी केले आहे.

विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद
विदर्भातून यावर्षी अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर व नागपूर येथून अनेक पक्षी निरीक्षिक व काही संस्था हा कार्यक्रम राबविणार आहे. अधिक माहितीसाठी www.birdcount.in या संकेतस्थळावर संपर्क करता येईल - डॉ. जयंत वडतकर, समन्वयक, पक्षीनिरीक्षण कार्यक्रम.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...