आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा पराभव; फडणवीस, गडकरींना धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भात भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ््या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारूढ भाजपला पराभवाचा जोरदार धक्का बसला. दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू चित्र असून सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आघाडीचा पाया रचतील अशी चिन्हे दिसत आहेत.

भाजपची सत्ता राहिलेल्या भंडारा िजल्हा परिषदेत भाजपला केवळ १३ जागांवर (मागील निवडणुकीत २५) समाधान मानावे लागले. सर्वाधिक १९ जागा पटकावत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे तर राष्ट्रवादीने १५ जागा मिळवून साऱ््यांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. ४ जागांवर अपक्ष तर शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर सातपैकी चार पंचायत समित्यांवर काँग्रेसने ताबा मिळविला आहे. निकाल पाहता भाजपचे स्थानिक खासदार नाना पटोले यांच्या राजकीय वर्चस्वाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजारच्या गोंदिया जिल्हा परिषदेतही नेमके हेच चित्र आहे. येथेही भाजपला पराभवाचा जोरदार धक्का बसला असून भाजपला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. २० जागा पटकावून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात. ८ पंचायत समित्यांपैकी भाजपने ४ तर काँग्रेस दोन तर राष्ट्रवादीने एका पंचायत समितीवर ताबा मिळविला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तर बसपाने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भाजपप्रती ग्रामीण मतदारांमध्ये काही अंशी नाराजी असल्याची चर्चा निवडणुकीच्या प्रचारात बरीच रंगली होती. निकाल पाहता ती खरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपमधील बंडखोरीही या पराभवाला मोठा हातभार लावून गेल्याचे मानले जात आहे. निवडणुकीच्या दोन महिने अगोदर माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सुपुत्र विजय शिवणकर यांनी भाजपला टाटा करून राष्ट्रवादी जवळ केल्याचा फटका भाजपला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा या दोन तालुक्यांमध्ये बसला. या दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.

फडणवीस, गडकरींना धक्का

विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप कमजोर असताना २०१० च्या निवडणुकीत भाजपने प्रथमच भंडारा व गोंदिया या दोन जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकावला होता. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या रूपाने विदर्भ सत्तेचे मोठे केंद्र बनले आहे. दोन्ही नेते प्रचारातही सहभागी झाले होते. या दोन्ही नेत्यांच्या दृष्टीने ही निवडणुक अप्रत्यक्षपणे प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र, मतदारांनी या नेत्यांना जोरदार धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रामुख्याने राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होत्या. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण राजकीय कसब पणाला लावून राष्ट्रवादीची कामगिरी उचलावल्याचे मानले जात आहे.

भंडारा जिल्हा परिषद (५२ जागा)

काँग्रेस--१९

राष्ट्रवादी काँग्रेस-१५

भाजप-१३

अपक्ष-४

शिवसेना-१

गोंदिया जिल्हा परिषद (५३ जागा)

राष्ट्रवादी काँग्रेस २०

भाजप १७

काँग्रेस १६