आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलगाईच्या शिकारीमुळे भाजपचे आमदार आशिष देशमुख अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नीलगायीचे शिकार प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या समर्थकांनी काटोल-नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसह तातडीने पत्रकार परिषद घेऊन शिकारीशी आमदार देशमुख यांचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

आमदार आशिष देशमुख यांचे हातात बंदुक घेतलेले मृत नीलगायी सोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती. शिकारीच्या वेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याने काही छायाचित्रे फेसबुकवर अपलोड केली. पाहाता पाहाता ही छायाचित्रे व्हाॅटस् अॅपवर फिरल्याने त्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आमदार देशमुख यांनी शिकार केल्याचे आराेप व्हायला लागले होते. हे प्रकरण अंगाशी येण्याची चिन्हे दिसताच नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह बुधवारी पत्रकार परिषद घेऊन शिकारीचा आराेप खोडून काढला. ३१ आॅक्टोबरला एका शेतकऱ्याच्या शेतात रोहीची शिकार करण्यात आल्याचे माहिती झाल्यामुळे आमदार देशमुख यांनी तेथे जाऊन पाहाणी केली. त्यावेळी शेकडाे शेतकरी तेथे होते.

जनजागृती व्हावी म्हणून छायाचित्र अपलोड केले
काटोल व नरखेड तालुक्यात रानडुक्कर व रोही यांचा शेतकऱ्यांना प्रचंड त्रास आहे. रोही म्हणजेच नीलगायी कळपाने येऊन उभे पीक फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणेही कठीण झाले आहे. त्याचा आमदार देशमुख यांनी विधिमंडळात पाठपुरावा केला. परिणामी रोही व रानडुकराला मारण्याची परवानगी देणारा शासन निर्णय जारी झाला. त्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून आमदार आशिष देशमुख यांनी मध्यरात्रीपर्यंत दौरा केला. या विषयी जागृती व्हावी म्हणून छायाचित्र फेसबुकवर टाकल्याचे संदीप सरोदे यांनी सांगितले.