आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची मानसिकता मुंबईत गेल्यावर बदलते, भाजपचे खासदार पटोलेंची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्री मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी कोणत्याही भागातील असो, मुंबईत गेले की त्यांची मानसिकता बदलते, अशी टीका भाजपचे खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी केली. अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनिअर मित्र परिवारातर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘विदर्भातील सिंचन व शेतकऱ्यांचे अश्रू’ हा चर्चासत्राचा विषय होता.  

महाराष्ट्र हे केंद्राकडून सर्वात कमी पैसे आणणारे राज्य आहे. इतर राज्ये खासदारांमार्फत भरपूर पैसे आणतात. महाराष्ट्र वगळता इतर खासदारांना खूप महत्त्व आहे. त्यांच्यासाठी राज्याच्या राजधानीत निवास व्यवस्था असते. एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी त्यांचा स्वीय सहायक असतो. महाराष्ट्रात मात्र खासदाराकडे दुर्लक्ष केले जाते. कदाचित राज्यातील आमदार व मंत्र्यांना खासदाराचे महत्त्व वाटण्याची भीती वाटत असावी. या संकुचित वृत्तीमुळेच महाराष्ट्र मागे राहिला, असे पटोले म्हणाले.  मी शेतकरी आहे. शेतकरी हीच माझी जात व धर्म आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदी यांच्याशीही वाद ओढवून घेतला अाहे. शेतीत सरकारची भागीदारी हवी, ग्रीन टॅक्स लावण्यात यावा आदी मागण्या आपण मांडल्या. शेतीत सरकारी भागीदारी असली तर शेतकरी कदापि आत्महत्या करणार नाही, असे पटोले म्हणाले.

ईश्वर सरकारला ताकद देवो 
अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील सर्व खासदारांची एक बैठक बोलावतात. त्या बैठकीत मी इतर राज्यातील खासदारांप्रमाणे मुंबईतही खासदारांना सोयी-सुविधा देण्याचा विषय मांडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेणेच बंद केले. मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांची मानसिकता बदलत असावी, अशी टीका पटोले यांनी केली. राज्यातील खासदारांचा उपयोग केला तर राज्यात कोट्यवधी रुपये येतील, असे ते म्हणाले. सातवा वेतन आयोग तसेच कर्जमाफीमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ईश्वरच ताकद देवो, असे पटोले म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...