आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात भाजप विराट कोहलीच्या भूमिकेत, निवडणुकीत हॅट्ट्रिक साधण्याचे आव्हान (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-  पक्षांतर्गत लाथाळ्यांपायी काँग्रेस पक्षाला स्वत:चे घर सावरण्यासाठी झगडावे लागत आहे. दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नाराज नेत्यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कशीबशी लाज राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रिपब्लिकन गटांची तर ‘न घर का न घाट का’ अशी अवस्था आहे. या परिस्थितीत नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप हॅट्ट्रिक साधणार का, या प्रश्नाचे उत्तर अाठवडाभरात मिळणार अाहे. असे असले तरी विराट कोहलीच्या टीम इंडियाप्रमाणे नागपुरात भाजपची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल सुरू आहे.

भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेवर नागपुरातील ‘हेडक्वार्टर’चा अंकुश चालतो, असे बोलले जाते. बऱ्याच अंशी ते खरेही आहे. त्या दृष्टीने भाजपसाठी नागपुरातील सत्ता टिकवणे हा अस्मितेचाच विषय ठरावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांसाठी होमपिचवरील सामना यंदा प्रतिष्ठेचा ठरणार आहे. भाजपला आव्हान देण्याची ताकद काँग्रेस या एकमेव पक्षात आहे.
 
मागील दहा वर्षांत विरोधी पक्ष या नात्याने प्रभावहीन ठरलेली काँग्रेस यंदा स्वत:ची पडझड रोखण्यातच व्यग्र आहे. अशाेक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणानंतर पक्षातील लाथाळ्यांची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. पक्षसंघटनेत वर्चस्व असलेल्या विलास मुत्तेमवार गटाच्या विरोधात नितीन राऊत आणि सतीश चतुर्वेदी या दोन्ही माजी मंत्र्यांचे गट पाडापाडीच्या राजकारणासाठी एकवटल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसारख्या नेत्यालाही नागपुरातील लाथाळ्यांपुढे हात टेकावे लागत आहेत. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसचे बंडखोर अधिकृत उमेदवारांचे नुकसान करण्याच्या तयारीत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीत राऊत-चतुर्वेदी यांची नाराज फौज नेमकी कोणती भूमिका बजावणार, यावर काँग्रेसचे आव्हान अवलंबून राहणार आहे.  

प्रभावी नेत्याची वानवा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता कार्यकर्तेही उरले नसल्याने या पक्षाची नागपुरात अस्तित्व राखण्याची धडपड सुरू अाहे. तीच गत शिवसेनेचीही. संघ आणि भाजपच्या या गडाच्या तटबंदीला किमान हादरे देण्याचीही या पक्षाची क्षमता नसल्याचे चित्र दिसते आहे. तिकीट न मिळाल्याने भाजपमधील नाराज मंडळींना उमेदवारी देऊन पक्षाची लाज राखण्याचा या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. अशा विरोधकांमध्ये कुठेतरी आपले अस्तित्व शोधण्याचा रिपब्लिकन गटांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. या साऱ्या राजकीय गदाराेळात माेठ्या प्रमाणात बंडखोरी होऊनही भाजप आश्वस्त वाटत आहे.   

बंडाेबांचा फटका बसण्याची भीती
सर्वाधिक प्रमाणात बंडखोरी होऊनही भाजपचा पारंपरिक मतदार शेवटी पक्षाच्याच बाजूने उभा राहील, असा आत्मविश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. अर्थात काही प्रमाणात त्याचा फटका भाजपला निश्चितपणे बसेल असे मानले जाते.
 
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात प्रचारास उतरणार आहेत. तर काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्टार प्रचारक प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहेत. छोट्या पक्षांना एकत्र घेऊन नागपूर महापालिकेवर सलग दोन टर्म सत्ता गाजवणाऱ्या भाजपला यंदा हॅट्ट्रिकचे वेध लागले आहेत. सत्ता स्वबळावर मिळावी, त्यासाठी टेकूची गरज पडू नये, यासाठी भाजपचा आटापिटा सुरू आहे.  दरम्यान, शेवटच्या अाठवड्यात मुख्यमंत्री व गडकरींनी सभांचा धडाका लावला अाहे.
 
प्रचाराचा भर विकास कामांवर  
नागपूर शहरभर, वस्त्यावस्त्यांमध्ये व्हिडिओ रथ फिरवून भाजपकडून मेट्रो रेल्वेचे काम, सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची चोवीस बाय सेव्हन योजना तसेच केंद्र व राज्याकडून नागपुरात आणल्या गेलेल्या प्रकल्पांचे मार्केटिंग सुरू आहे. ही कामे प्रत्यक्ष रस्त्यांवर दिसत असल्याने लोकांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.
 
तर दुसरीकडे विकासाचे प्रकल्प राबवताना भाजपने जवळच्या कंत्राटदारांना कशी कंत्राटे दिली, मेट्रो रेल्वेचा प्रकल्प नागपुरात आणण्याचे श्रेय काँग्रेसला कसे आहे, हे लोकांच्या मनात बिंबवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दसताे. असे असले तरीही आजही या पक्षाचा प्रचार प्रामुख्याने नोटबंदीविरोधाच्या आसपासच घुटमळतो आहे.
बातम्या आणखी आहेत...