आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाच्या बीटी बियाण्यांचे वाण यापुढे खासगी कंपन्या विकसित करणार नाही - कृषिमंत्री पांडुुरंग फुंडकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यात यापुढे कापसाच्या बीटी बियाण्यांचे वाण कोणतीही खासगी कंपनी विकसित करणार नाही. राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि केंद्र सरकारचे कापूस संशोधन केंद्र हे वाण विकसित करेल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत बुधवारी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फुंडकरांनी हे स्पष्टीकरण दिले.

२०१८ मध्ये कृषी विद्यापीठांकडून नवे वाण विकसित केल्यानंतर राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पॅकेट साडेतीनशे रुपये दराने बीटी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मोन्सेटो ही खासगी कंपनी कापसाचे बीटी बियाणे विकसित करत होती. मात्र, ही कंपनी शेतकऱ्यांचे शोषण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे फुंडकरांनी स्पष्ट केले.

बीटी कपाशीच्या बियाण्यामधील डेल्टा इंडो टाेक्झिन या विषामुळे किडीमध्ये प्रतिकार क्षमता वाढल्याने त्यावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने असे महागडे बियाणे खरेदी करूनही शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यांचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून आधीच दुष्काळ, त्यात हा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे पंडित यांनी निदर्शनास आणून दिले. याच वेळी खासगी कंपन्या लूट करत असताना सरकारच्या कृषी विद्यापीठांमधील संशोधन विभाग मात्र सुस्त झाला असून वर्षाला या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारावर अडीचशे कोटी खर्च होत असल्याकडेही आमदार अमरसिंह पंडित यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

२०१५ च्या अधिसूचनेनुसार सरकारने बीटी कापूस बियाण्यांची विक्री किंमत १०० रुपयांनी कमी करून बीजी १ प्रकारासाठी ७३० रुपये प्रति पाकीट तसेच बीजी २ प्रकारासाठी ८३० याप्रमाणे दर घोषित करण्यात आले आहेत. बीटी बियाण्यांच्या सुधारित वाणांच्या संशोधनाकरिता कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्यात संयुक्त करार झाला आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाद्वारे विकसित केलेल्या एनएचएच ४४ या संकरित वाणाचे बीटी स्वरूपात संस्करण करून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येईल. याचबरोबर महाबीजद्वारे सार्वजनिक क्षेत्रांमधील अन्य वाणांमध्ये बीटी जनुक प्रत्याराेपणाचे काम करण्यात आले आहे. याचबरोबर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून २१ वाणंमध्ये बीजी १ या बीटीचा समावेश करून चाचण्या घेण्यात येत आहेत. तसेच पंजाबराव देशमुख विद्यापीठही कोरडवाहू शेतीसाठी एक वाण विकसित करत आहे. यामुळे २०१८ ला २ लाख शेतकऱ्यांना ३५० रुपयांना एक बियाणांचे पाकीट देता येईल, असे फुंडकर यांनी सांगितले.
परतीच्या पावसाची नुकसान भरपाई १५ जानेवारीपर्यंत
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल. भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हेमंत टकले यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
बातम्या आणखी आहेत...