आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडांनी दरवाजे तोडून चार ठिकाणी दरोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गाढ झोपलेल्या नागरिकांना उठवून दगडांच्या फाड्यांनी दरवाजे फोडून सात ते आठ अज्ञात दरोडेखाेरांनी चार घरांमध्ये दरोडा टाकला.रविवारी (दि. २) मध्यरात्री नया अमरावती रेल्वेस्टेशन परिसरातील हरिशांती कॉलनी क्रमांक एकमध्ये अर्धा तास धुमाकूळ घालून दोन घरांमधून सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला. घरातील झोपलेल्या माणसांना उठवून टाकलेल्या या विचित्र दरोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी सुधीर वडस्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हरिशांती कॉलनीमध्ये निर्मलकुमार हरिमलदास मूलचंदानी (५६), सुधीर रामकृष्णजी वडस्कर (४०), रुपचंदजी हिरालाल गंगन (५८) आणि सरोज कारुष यांची एकाच रांगेत घरे आहेत.रविवारी मध्यरात्री दरोडेखारे पहिल्यांदा मुलचंदानी यांच्या घरात घुसले. त्या वेळी मुलचंदानी यांचा मुलगा राम (३१) हा एकटाच घरात होता. मूलचंदानी यांचा ट्रान्सपोर्टींगचा व्यवसाय आहे. ते व्यवसायानिमित्तच वर्धेला गेले होते. दरोडेखोर रात्री दीड वाजताच्या सुमारास आले. त्यांनी घराचे लॉक तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते तुटले नाही. त्यामुळे बाहेरून अंदाजे १० ते १५ किलो वजनाची एक दगडाची फाडी आणून मुख्य दरवाज्यावर आपटून दरवाजा तोडला. इतकी वजनी फाळी मारल्यामुळे मुख्य दरवाज्याने दोन तुकडे झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यामुळे राम मुलचंदानी झोपेतून उठले. तोवर दरोडेखोर घरात शिरले होते. त्यांनी रामला काठीने मारून त्याच ठिकाणी असलेल्या कापडाने बांधून एका बेडरुममध्ये डांबून ठेवले. घरात सोने रोख कुठे आहे, याबाबत विचारणा केली, त्यांनी सुरूवातीला नकार दिला.त्यानंतर दरोडेखोरांनी फ्रिजमधून पाण्याची एक बॉटल काढली.बॉटलमधील पाणी बाहेरून खोलीच्या आतमध्ये सोडले. पुर्वीच घाबरलेल्या रामला सांगितले की, हे पेट्रोल आहे, तू सांगितले नाही तर पेटवून देऊ. या धमकीमुळे रामने दुसऱ्या बेडरुममधील कपाटात असलेल्या सोन्याची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी कपाट फोडून त्यामधून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांची घड्याळ, २३ हजार रोख, एटीएम कार्ड राम यांचा मोबाईल असा जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला. त्यानंतर या टोळीने सुधीर वडस्कर यांच्या घराकडे मोर्चा वळवला. सुरुवातीला दरवाजा ठोकला मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुख्य दरवाज्यावर मोठ्या दगडाचा मारा केला.त्यामुळे दरवाज्याचे दोन तुकडे होताच दरोडेखोर घरात घुसले. यावेळी वडस्कर यांच्या घरात पत्नी अडीच वर्षांचा मुलगा असे तिघेच होते. त्यांच्या पत्नीच्या गळ्यात असलेले मंगळसूत्र, कानातील दागिने तसेच घरात असलेले आठ ग्रॅमचे मंगळसूत्र १८ हजारांची रोख असा जवळपास ६० ते ७० हजारांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर वडस्कर त्यांच्या मुलाला पत्नीला एका रुममध्ये डांबून ते याच कॉलनीमधील किराणा व्यवसायिक असलेल्या रुपचंद गंगन यांच्या घरात घुसले. गंगन यांच्या घराला मुख्य दरवाज्यापूर्वी लोखंडी ग्रील आहे, ही लोखंडी ग्रील तुटल्यामुळे दरोडेखोरांनी एका रुमच्या खिडकीमधून टॉर्च मारून खिडकीचा काच वाजवून ‘दरवाजा खोलो’ असे वारंवार धमकावत होते. मात्र गंगन यांनी दरवाजा उघडला नाही. त्यांनी दोन ते तीनवेळी गंगन यांच्याकडील लोखंडी ग्रील तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना लोखंडी ग्रील तोडता आल्यामुळे दरोडेखोरांनी खिडकीची काच तोडून रिकाम्या हाताने परतले. गंगन यांच्याच घराला लागून सरोज कारुष यांचे घर आहे. दरम्यान दरोडेखोर कारुष यांच्या घरात जाण्यापूर्वी राम मुलचंदानी कशीबशी स्वत:ची सुटका करून शेजारीच असलेल्या कारुष यांच्या घरी आला होता. कारुष यांच्या घरी सरोज कारुष त्यांचा २३ वर्षीय मुलगा आकाश हे दोघेच होते. दरम्यान, राम हा घटनाक्रम त्यांना सांगत असताना हे दरोडेखोर कारुष यांच्या घरात शिरले. यावेळी स्वत:चा जीव वाचवत आकाश, सरोज कारुष त्याठिकाणी आलेले राम मूलचंदानी हे पंलगाखाली दडले. कारुष यांच्या घरातही त्यांना काही मिळाले नाही. दरम्यान अर्धा तासापासून सुरू असलेला हा धुडगुस परिसरातील इतर नागरिकांच्या लक्षात आला. त्यावेळी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर दहा मिनिटांतच पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र तत्पुर्वीच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे, एसीपी यांच्यासह गुन्हे शाखा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. तसेच पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीसुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. याचवेळी श्वानसुद्धा आला होता. श्वानाने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत दरोडेखोरांचा मार्ग दाखवला. घटनास्थळापासून बडनेरा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्याठिकाणी श्वान थंाबले. यावरून दरोडेखोरांनी वाहन हे पुलाखाली किंवा त्या परिसरात उभे करून पायदळ हरिशांती कॉलनीमध्ये गेले असावेत. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी सुधीर वडस्कर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरोडेखोर हे हापपॅन्ट घालून आले होते. तसेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास पकडणाऱ्याचे हात घसरावेत या हेतूने त्यांनी स्वत:च्या अंगाला तेल लावले होते. ते एकमेकांसोबत हिंदीत संवाद साधत होते. तसेच ज्यांच्या घरात दरोडा पडला, त्यांना धमक्यासुद्धा ते हिंदीतच देत होते. असे ज्यांच्या घरात दरोडा पडला, ते नागरिक सांगत होते. घटनेनंतर आठ ते दहा तासांनीसुद्धा या परिसरातील नागरिक धास्तावलेले होते. यावरून मध्यरात्रीचा थरार किती भयावह होता, हे जाणवत होते.
नागपुरातहीअशाच पद्धतीचा दरोडा : शहरातज्या पद्धतीने दरोडेखोरांनी दगडी फाळ्या टाकून दरवाजा तोडला. ही पद्धत शहरात पहिल्यांदाच दिसून आली. अशाच पद्धतीने दरवाजा तोडून दरोडा टाकल्याची घटना नागपुरातील हुडकेश्वर परिसरात दोन दिवसांपूर्वीच घडली आहे.पोलिसांनी हरिशांती कॉलनीमधून दोन काठ्या जप्त केल्या, त्याच प्रकारच्या काठ्या नागपुरात दरोडेखोरांनी वापरल्या होत्या, यावरून नागपूर शहरात दरोडा टाकणारी टोळी एक असावी,असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रेकीअंतीटाकला दरोडा : हरिशांतीकॉलनी ही साईनगरपासूनच जवळपास दोन किलोमीटर आतमध्ये आहे. या कॉलनीला दोन बाजूंनी जंगल आहे. तसेच एक मार्ग थेट बडनेरा मार्गावर निघतो, त्याठिकाणी दोन किलोमीटर चालत यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी किंवा त्यापैकी एखाद्याने या परिसरात पूर्वी रेकी केली नंतर दरोडा टाकला, असा पोलिसांचा कयास आहे. कारण नवीन व्यक्ती या भागातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी नक्कीच चाचपडतो.

दरोडेखोर परप्रांतीय, तपास सुरू
दरम्यान घटनास्थळावरून श्वानाने दिलेल्या दिशेने पोलिस पोहचले. त्याच ठिकाणी मध्यरात्री एक चारचाकी वाहन पुलाखाली उभे होते. हे वाहन झारखंडचे असावे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच त्याच ठिकाणाहून पोलिसांना चिवड्याचे रिकामे पॉकेट मिळून आले, हे पॉकेट छत्तीसगड येथील असल्याचे शिक्क्यावरून लक्षात आले . त्या दिशेने पोलिस तपास सुरू आहे.रोडेखोरांच्या भोषेची लकब पाहता ती मध्यप्रदेशमधील हिंदीसारखी असल्याचे पोलिसांना घटनास्थळावर समजले आहे.

चार शोध पथक गठित
^दरोड्याची घटना गंभीर आहे. रेकीअंतीच हा दरोडा असावा. दरोडेखोर हे परप्रांतातील असावेत, असा अंदाज आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन अन्य दोन असे एकूण चार पथक तयार केले आहे. विभागातील इतर जिल्ह्यातही ही माहिती आम्ही दिली आहे. त्यांच्या शोधासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त.

दरोडेखोर पळताना महिला म्हणाली, चोर आले चोर
चार घरात दरोडा पडल्यामुळे इतरांनी घरांच्या साखळ्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. दरोडेखोर पळत असताना एका महिलेने चोर चोर, असा आवाज काढला तर दरोडेखोर त्या महिलेला म्हणाले, हां चिल्लाओ हम चोर ही है। तसेच पळता पळता अन्य एका महिलेला म्हणाले, अब तुम दोनों रह गये। तसेच घरात दरोडा टाकताना घरातील नागरिकांना म्हणाले, शांती मे रहोगे तो फायदे मे रहोंगे।
घरांचे दरवाजेही ठरू लागले आता कूचकामी,रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
घराचे लॉक तुटत नसल्याने दरोडेखोरांनी १० ते १५ किलो वजनाचा दगड घेऊन मुख्य दरवाज्यावर आपटल्याने मुख्य दरवाज्याने दोन तुकडे झाले.त्यानंतर लूटमार केली.
लुटीच्या ऐवजावरून दरोडेखोरांमध्ये बाचाबाची : दोन्ही घरातील ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोर एकमेकांमध्ये वाद घालत होते. लुटीचा ऐवज एकटाच घेतो का? दुसऱ्याला दे, अशा कारणावरून ते एकमेकांसोबत वाद घालत होते. यावेळी दरोडेखोरांमधील फुट दिसून येत होती.

शांती मे रहोंगे तो फायदे मे रहोंगे.
‘हा चिल्लाओ हम चोर ही है!’
बातम्या आणखी आहेत...