आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्यात पुलावर ST लटकली, कंटेनर कोसळला; 25 जणांचे प्राण वाचले, चालकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलावर लटकलेली बस. - Divya Marathi
पुलावर लटकलेली बस.

नांदुरा / जळगाव जामोद- बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येरळी पुलावर गुरुवारी कंटेनर व बसची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने पुलाच्या संरक्षित कठड्यात बसचे टायर अडकल्याने २५ प्रवासी बचावले. पण, प्राण वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेणाऱ्या कंटेनर चालकाचा चिखलात फसून मृत्यू झाला. 


 या अपघातात बसचा काही भाग पुलावर, तर काही भाग पात्राकडे लटकत होता. बस नदीपात्रात कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता. या अपघातामुळे जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक ४-५ ठप्प होती. जळगाव जामोद अागाराची बस (एमएच ०७ सी ९२७)  २५ प्रवाशांना घेऊन जळगाववरून नांदुरामार्गे बुलडाण्याकडे जात होती. पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून नांदुऱ्याकडून जळगावकडे सिमेंट घेऊन येणाऱ्या कंटेनरने  (एमएच ४० वाय ८५०९) या बसला धडक दिली. त्यामुळे बस सुमारे १० फूट मागे जाऊन पुलावरील कठड्याला अडकली, तर कंटेनर नदीपात्रात पडला. परंतु, जीव वाचवण्यासाठी कंटेनरच्या चालकाने अाधीच नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रातील चिखलात फसून त्याचा मृत्यू झाला.  बसमधील सायराबी सय्यद जाफर, समीनाबी सय्यद जुबेर (जळगाव), दुर्गा किसन सावदेकर व संगीता प्रल्हाद कोकाटे हे प्रवासी जखमी झाले आहेत.  


सुदैवाने बसचा दरवाजादेखील पुलाच्या बाजूने होता. अपघातानंतर लगेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचालक व वाहकाने ग्रामस्थांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक चार ते पाच तास ठप्प पडली होती. दुपारी चारच्या सुमारास तीन क्रेनचा वापर करून पुलावर अडकलेली बस बाहेर काढण्यात आली, तर कंटनेर चालकाचा चिखलातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस कर्मचारी अमोल राऊत, प्रशांत धंदर व ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर यांनी प्रयत्न केले. वृत्त लिहिपर्यंत नदीपात्रात पडलेले कंटनेर बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 


नदी पुलावर नव्हते संरक्षक कठडे  
पावसाळ्यापूर्वी पूर्णा नदीवरील या ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यानंतर ते पुन्हा बसवले जातात. परंतु पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील अद्यापही पुलाला कठडे बसवण्यात आले नाहीत. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा अधोरेखित होत आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...