आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिझनेसमन’चा मुलगा निघाला चोर, हौसेखातर चोरल्या दोन दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (दि. २५) ताब्यात घेतले. दरम्यान, आपण हौसेखातर दुचाकींची चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त केली असून त्याने आतापर्यंत दोन दुचाकींची चोरल्याचे तपासात पुढे आले आहे.

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागात राहणारा हा १५ वर्षीय मुलगा आहे. तो दुचाकी चोरीमध्ये सहभागी असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. रविवारी (दि. २५) गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन दुचाकींची चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच एक चोरीची दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहे. या मुलाचे वडील व्यावसायिक असून त्याच्या घरीसुध्दा दुचाकी आहे. मात्र वेगवेगळ्या दुचाकी चालवण्याची हौस असल्यामुळे आपण चोरी करायचो, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. महिनाभरापूर्वी चोरलेली दुचाकी त्याने फिरवल्यानंतर रस्त्यावर सोडून दिली होती. ती दुचाकी नांदगाव पेठ पोलिसांना बेवारस आढळली होती. पुढील कारवाईसाठी गुन्हे शाखेने त्याला नांदगाव पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ज्याची दुचाकी त्याला मिळावी हा प्रयत्न
दुचाकी चोरी प्रकरणात पोलिसांनी त्या मुलाला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना चोरीची कबूली दिली. मात्र ही चोरी केवळ हौस पुर्ण करण्यासाठी करत असल्याचेही त्याने सांगितले. इतकेच नाही तर दुचाकी फिरवून झाल्यानंतर ज्याची दुचाकी आहे, त्याला ती परत मिळावी म्हणून त्याच्या घराच्या आजूबाजूनेच आपण सोडून देत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...