आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या ‘वाघां’ची पूर्ण काळजी घेतोय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘अमिताभ बच्चन यांना वन विभागाचे व्याघ्रदूत नेमल्यापासून वाघांची संख्या वाढली का वाघिणीची?’ असा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच ‘भाजपचे सरकार अाल्यापासून काही ‘वाघ’ गुरगुरत अाहेत’ असा टाेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी साेमवारी विधानसभेत उपस्थित केला. मात्र, हजरजवाबी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्याला चाेख प्रत्त्युत्तर दिले. ‘भुजबळसाहेब चिंता करू नका. आमच्याकडे ‘वाघां’चे (शिवसेनेला उद्देशून) संवर्धन अगदी व्यवस्थित सुरू आहे. वाघांच्या ‘अधिवासा’ची (हॅबीटॅट) आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत…त्यांचीही तक्रार नाही.’ दाेन्ही नेत्यांमधील या जुगलबंदीने सभागृहात चांगलीच खसखस पिकली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सोमवारी वन विभागाचे प्रश्न चर्चेला आले. त्यातही वाघ आणि बिबट्यांचेच प्रश्न अधिक होते. वनमंत्री मुनगंटीवार प्रश्नावर मुद्देसूद उत्तर देत होते. या गहन आणि गंभीर चर्चेत चिमटे काढण्याची सवय असलेले छगन भुजबळ सहभागी झाले. ‘अमिताभ बच्चन व्याघ्रदूत झाल्यापासून वाघांची संख्या वाढली की वाघिणींची?’ असा पहिला प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. तसेच ‘फडणवीसांचे सरकार सत्तेत आल्यापासून काही वाघ सारखे गुरगुरत असतात. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत?’ या भुजबळांच्या दुसऱ्या प्रश्नावर तर सभागृहात हशा पिकला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही हसून दाद दिली. भुजबळांच्या गुगलीवर हजरजबाबी मुनगंटीवार यांनी चाेख उत्तर दिले. ‘अामच्या ‘वाघांचे’ संवर्धन व्यवस्थित सुरू असल्याचे आणि त्यांच्या अधिवासाची विशेष काळजी घेतली जाते,’ असे ते म्हणाले. या उत्तराला भुजबळांसह सर्वांनीच हसून दाद दिली. अमिताभ बच्चन हे व्याघ्रदूत झाल्याने वाघ वाढले की वाघिणी याचा शोध घेण्यासाठी भुजबळांचीच एकसदस्य समिती नेमण्याचा िवचार सरकारमध्ये सुरू असल्याचे सांगत त्यांनी भुजबळांचीच ‘विकेट’ घेतली.
बिबट्यांसाठी पाट्या
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बिबट्यांच्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करताना ‘बिबटे विदर्भात सोडा’, अशी सूचना केली. त्यावर वनमंत्र्यांनी ‘बिबट्यांपासून सावध कसे राहायचे’ यावर लोकशिक्षणावरही भर देणार असल्याचे सांगितले. नेमका ‘लोकशिक्षण’ हा शब्द पकडून आता बिबट्यांसाठी पाट्या लावणार काय? असा चिमटे प्रश्न विखे पाटलांनी उपस्थित केल्याने मुनगंटीवारांचा पारा चढला. ‘अहो, लोकशिक्षण म्हणजे बिबट्यांचे शिक्षण नव्हे. १५ वर्षांत तुमच्या पाट्या वाचून बिबटे थांबले नाहीत’, असे सांगत लोकांनी काय करायला हवे हे सांगण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...