आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childrens Of Naxalites Not Going On Their Footprints

नक्षली नेत्यांच्या मुलांचा ‘सॉफ्ट’वेअर मार्ग!,हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बंदुकीच्या जोरावर क्रांती घडवण्याचा कडव्या डाव्या विचारांचा प्रसार करणाऱ्या नक्षलवादी चळवळीतील नेत्यांची मुले मात्र या मार्गाने जायला तयार नाहीत. उच्च शिक्षण घेतल्यावर
लठ्ठ पगाराच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्या त्यांनाही आकर्षित करत आहेत. नक्षलविरोधी अभियानातील सूत्रांनुसार, अनेक नेत्यांनी त्यांच्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे. त्यापैकी बरीचशी मुले आकर्षक पॅकेजच्या नोकऱ्यांवर आहेत. चांगले व सन्मार्गी आयुष्य जगण्याच्या आशेमुळे हा सकारात्मक बदल घडून येतोय.

चांगल्या व सन्मार्गी जीवनाच्या अाशेने झाले सकारात्मक बदल
1 नक्षल नेता विजय रेड्डी ऊर्फ सुगुलरी चिन्नन्ना ऊर्फ नागन्ना याचा मोठा मुलगा बी. टेक. आहे. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत आहे. छोटा मुलगा प्रताप हा सध्या इंजिनिअरिंग करतोय.
2 कंपनी कमांडर के. के. मुरलीधरन ऊर्फ राजेंद्र ऊर्फ गोपी ऊर्फ विजयन्ना ऊर्फ सन्नी याचा मुलगा नचिकेतन हा कोचीत सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे.
3 छत्तीसगडमधील नक्षलींचा वरिष्ठ नेता राजचंद्र रेड्डी ऊर्फ कट्टारामचंद्र ऊर्फ राजू दादा ऊर्फ गुडसा उसेंडी याची मुलगी स्नेहा ऊर्फ डॉली ही इंजिनिअरिंग पदवी घेऊन एका आयटी कंपनीत मोठ्या पगारावर आहे. मुलगाही दंतशास्त्राच्या अभ्यासक्रमाला आहे.
4 माओवादी साहित्य वाटप करणारा देवकुमार सिंह ऊर्फ अरविंद निशांत ऊर्फ सुजित याचा मुलगा कानपूर आयआयटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
5 कंपनी कमांडर पदावरील मल्लराजी रेड्डी ऊर्फ सतेन्ना ऊर्फ सयन्ना ऊर्फ सागर ऊर्फ आलोक ऊर्फ देशपांडे ऊर्फ लक्ष्मण याची मुलगी सध्या उच्च शिक्षण घेत आहे.

मुलींनी डॉक्टर व्हावे
उत्तर गडचिरोली-गोंदिया डिव्हिजनचा कमिटी सदस्य पहाडसिंह ऊर्फ कुमारसाय कतलामीचे एक पत्र पोलिसांच्या हाती लागले. त्यात त्याने आपल्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
नक्षलींची विचारसरणी नव्या पिढीला पटण्यासारखी नाही. त्यामुळेच नक्षलवादी नेत्यांच्या मुलांचा कलही चांगले आयुष्य जगण्याकडे आढळून येतो.
रवींद्र कदम, स्पेशल डीआयजी, गडचिरोली