आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागरिकांनो, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात पावसाळ्यात ७०० ते ८०० मि.मी. इतका प्रचंड पाऊस पडतो. यापैकी किती पाणी आपण अडवतो हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील लातूर शहराला २५ दिवसांतून एक वेळा पिण्याचे पाणी येत आहे. शहरात रिक्षांपेक्षा टँकरची संख्या अधिक झाली आहे. अशी भीषण स्थिती आपल्याकडे येणार नाही असे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा हिशेब त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी (दि. १६) केले.

पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या संवर्धनासाठी १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील वर्धा, पूर्णा, चारघड, चंद्रभागा, सापन, शहानूर गरघा या सात नद्यांचे पाणी कलशात आणण्यात आले. बचत भवनात या कलशांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करून जल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी गित्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता घाणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे अध्यक्ष मधुकर घारड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर, पोहेकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टींसह सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गित्ते म्हणाले, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करून घेण्यासाठी कृषी विभागाने पाणी वापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश गित्तेे यांनी दिले. येणाऱ्या काळात शेतीला पाइपलाइनने पाणी देण्याचा शासन विचार करत आहे. जिल्ह्यात ठिबक, तुषार सिंचन मोहीम राबवण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यावर २५ टक्के सबसिडी असून, मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन अर्ज प्राप्त आहे. जलसंपदा विभाग पाण्याची साठवणूक जरी करत असले तरी पाण्याचा खरा ग्राहक कृषी विभाग आहे. यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन गित्ते यांनी केले. कोल्हापुरी पद्धतीच्या एक बंधाऱ्यामुळे १५० टीएमसी पाण्याचा साठा निर्माण होतो. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची उभारणी करण्याची गरज असल्याचे सांगितले. घाणेकर यांनी सर्व कार्यालयांच्या मार्फत घरोघरी जलजागृती सप्ताह पोहोचवण्याचे आवाहन केले.

विविध उपक्रमाने साजरा होणार जलजागृती सप्ताह
जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आजपासून शहरात पाणी बचावचा जागर सुरू झाला असून, या सप्ताहात अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये १७ मार्च रोजी पाणी वापर संस्था लाभधारकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणी वापर संस्था लाभधारकांच्या कार्यशाळा तालुकानिहाय होणार आहे. जलसप्ताहात दर्यापूर तालुक्यातील १० गावांमध्ये, अमरावतीमधील १४, चांदूर रेल्वेमधून २०, अंजनगाव सुर्जी १०, वरुड ३८, मोर्शी २२, तिवसा २७, धामणगाव रेल्वे ४५, चांदूर बाजार १५ अन्य तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर जलजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.

बडगा उगारल्याशिवाय अपव्यय टळणार नाही
आपणाकडे भूजल संवर्धनासंदर्भात अनेक कायदे आहेत, त्याचा वापर होत नाही. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, म्हणून कायद्याचा काही उपयोग होत नाही. प्रबोधन आणि कायद्याची चळवळ दोन्ही गोष्टी एकत्र होण्याची गरज आहे. कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय पाण्याचा अपव्यय टळणार नसल्याचे मधुकर घारड यांनी सांगितले. जलजागृती सप्ताहात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. झाडे पाऊस पाडण्याचे, पर्यावरण संरक्षणाचे काम करतात. जलसंधारणाचे खरे काम जंगल, झाडेच करतात. अन्न, वस्त्रापेक्षाही अधिक महत्त्व झाडांना आहे. कारण झाडे ऑक्सिजन देतात, पाऊस पाडतात, पाणी साठवतात.
बातम्या आणखी आहेत...