आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Citizens Will Pay Rupee For Down The Fly Over Parking

उड्डाणपुलाखालच्या पार्किंगसाठी नागरिकांना मोजावे लागणार पैसे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील पंचवटी राजकमल चौकातील उड्डाणपुलाखाली वाहने उभी करताना पे अँड पार्कचा प्रस्ताव बुधवारी (दि. २०) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आल्याने आता पार्किंगसाठी पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पार्किंगच्या नावाखाली नागरिकांवर भुर्दंड लादणाऱ्या या प्रस्तावाचे बहुतांश नगरसेवकांनी समर्थन केले. मात्र, बहुमताचा प्रस्ताव असतानादेखील महापौर रीना नंदा यांनी त्याला स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तूर्तास सामान्यांच्या खिशाला चुना लावण्याचा प्रस्ताव तूर्तास लांबला आहे.
एमएसआरडीसी योजनेअंतर्गत शहरात १० ते १२ वर्षांपूर्वी शहरात दोन उड्डाणपुलांची निर्मिती करण्यात आली. राजापेठ पोलिस स्टेशन ते इर्विन चौक तसेच गाडगेनगर ते पंचवटी अशा दोन उड्डाणपुलाचा यामध्ये समावेश आहे. उड्डाणपुलाच्या निर्मितीपासून त्याखाली वाहनांची विनामूल्य पार्किंग सुविधा देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली सुविधा मोडीत काढत ‘पे अँड पार्क’ लागू करण्यावर बहुतांश नगरसेवक प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राजी असल्याचे दिसून आले. उड्डाणपुलाखाली बहुतांश व्यापाऱ्यांची वाहने लावली जात असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. ‘पे अँड पार्क’ लागू करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांवरदेखील त्याचा निश्चित भुर्दंड पडणार आहे. आता मोफत असलेली सुविधा यानंतर विकत देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला असल्याचे या प्रस्तावावरून स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या सभागृहात विषय सभापटलावर आल्यानंतर रिपाइं (आठवले)चे नगरसेवक प्रकाश बनसोड यांनी प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले. व्यापाऱ्यांनी पार्किंग गिळंकृत केल्याचे सांगत हा प्रस्ताव योग्य आहे, हे पटवून दिले. यावर चर्चा आरंभ झाल्यानंतर विजय नागपुरे, प्रदीप बाजड, जयश्री मोरे, प्रा. डॉ. सुजाता झाडे, सुनील काळे, संजय अग्रवाल, बाळासाहेब भुयार, प्रवीण मेश्राम, धीरज हिवसे, जयश्री मोरय्या, नीलिमा काळे यांच्यासह काही नगरसेवकांनी याचे समर्थन केले. मात्र, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला. हा प्रस्ताव जनविरोधी असल्याने स्थगित ठेवण्याची मागणी केली. पक्षनेते बबलू शेखावत, विलास इंगोले, चेतन पवार यांनी हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची विनंती केली. या विषयावरून गोंधळ झाल्याने महापौर रीना नंदा यांनी १० मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले.

कामकाज आरंभ
झाल्यानंतर पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुढील सभेत यावर चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर महापौरांनी हा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्राकरिता प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक दुरुस्तीसाठी चार महिने बंद ठेवण्याच्या प्रस्तावास देखील मंजुरी देण्यात आली. या वेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर, सर्व गटनेते नगरसेवक उपस्थित होते.

हरकती मागवणार : उड्डाणपुलाखाली‘पे अँड पार्क’ आरंभ करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती तक्रारी मागवल्या जाणार आहे. नागरिकांकडून हरकती मागवण्याबाबत सदस्यांकडून अाग्रह धरण्यात आला. उड्डाणपुलाखालील पार्किंगचा वापर व्यापारी करत असल्याने नागरिकांना वाहन लावण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

नेत्यांची पकड सुटली : ‘पेअँड पार्किंग’च्या विषयावर पुढील सभेत चर्चा करणार असल्याचे पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. सभागृहातील महत्त्वपूर्ण पदांवरील नेत्यांनी विषयावर मत स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांकडून विरोधी भूमिका घेण्यात आली. या प्रचंड असमतोलामुळे सभागृहातील नेत्यांची पकड तर सुटत चालली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दादागिरी चालणार नाही
नेहमी प्रमाणे आजदेखील सर्वसाधारण सभेत भाजपचे संजय अग्रवाल आणि काँग्रेसचे बबलू शेखावत यांच्यादरम्यान शाब्दिक जुगलबंदी झाली. ‘पे अँड पार्क’ विषयावर चर्चा सुरू असताना अग्रवाल यांनी बबलूभाऊ दादागिरी चालणार नाही, अशी टिप्पणी केली. यावर फालतू गोष्ट करू नका, असे उत्तर शेखावत यांनी दिले.

।-कोट

व्यापारी संकुलांचे पार्किंग गायब
शहरातील अनेक व्यापारी संकुलांचे बांधकाम करताना पार्किंगला बगल देण्यात आल्याची धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. तळमजल्यात पार्किंग असताना तेथे दुकाने थाटण्यात आली. अनेक व्यापारी संकुलांचे पार्किंग बंद राहत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक व्यापारी संकुलात पार्किंगचा उतार धोकादायक असल्याने वाहनचालक धास्तावतात.

पुढे काय? नागरिकांवर भुर्दंड
उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’चे शुल्क धोरण निश्चित करण्यास बहुतांश नगरसेवकांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे यापुढे सामान्य नागरिकांना उड्डाणपुलाखाली मोफत वाहने पार्क करण्याची सुविधा हिरावून घेतली जाणार आहे. काही व्यापाऱ्यांच्या चुकीचा भुर्दंड शहर तसेच बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांवर पडण्याची शक्यता आहे.

विषय तूर्तास ठेवलाय स्थगित
^शहरातील पार्किंगच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय असल्याने यावर नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. विरोधी पक्ष नेत्यांकडून सूचना आल्याने विषय स्थगित ठेवला असून, यासंबंधी व्यापाऱ्यांची बैठक,चर्चा करून पुढील सभेत प्रस्ताव ठेवला जाईल. रीना नंदा, महापौर
शहरात यापुढे उड्डाणपुलाखालील पार्किगसाठीसुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत.