आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सरकार’च्या धर्तीवर मनपाचेही ‘स्वच्छ शहर अॅप’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्य शासनाच्या ‘आपले सरकारच्या’ धर्तीवर अमरावती महापालिकेनेही ‘स्वच्छ शहर अॅप’ ची तयारी सुरू केली आहे. शहरातील अस्वच्छतेबाबत मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. शिवाय स्वच्छता करण्यात आल्यानंतर त्याची माहिती देखील तक्रारकर्त्याला दिली जाणार अाहे.
महापालिकेच्या साफसफाई विभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर देखील साफसफाई केली जात नसल्याची बाब नुकतीच उघड झाली. महापालिकेच्या ढिसाळ कामामुळे त्रस्त झालेल्या रहाटगाव येथील युवक शुभम वऱ्हेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या मोबाइल अॅपचा आधार घेतला. अापले सरकारवर तक्रार करताच थेट मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रहाटगावात एक दिवस नाही तर तब्बल तीन दिवस साफसफाई मोहिम राबविली. आपले सरकारच्या धर्तीवर शहरातील साफसफाईचे नियमन करण्याच्या दृष्टिने महापालिकेने देखील स्वतंत्र मोबाइल अप्लीकेशन नागरिकांच्या सेवेत देण्याची तयारी आरंभली आहे. कामधेनू जॉब प्लेसमेंट अॅण्ड स्किल डेवलपमेंट सर्विसेस या एजंन्सीकडून हे मोबाइल अप्लीकेशन तयार केले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच निरीक्षकांची बैठक घेत अप्लीकेशनबाबत माहिती दिली. सुरूवातीला महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व वार्ड निहाय आरोग्य निरीक्षकांचे मोबाइल क्रमांक या प्रणालीमध्ये अंतर्भूत केले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियान प्रमाणे महापालिकेचे मोबाइल अॅप कार्य करणार आहे. निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची माहिती देखील प्रणालीमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. नागरिकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुक्त, आरोग्य अधिकारी (स्वच्छता), आरोग्य निरीक्षकांच्या मोबाइलवर याबाबत संदेश प्राप्त होणार आहे. साफसफाई होण्यापूर्वीचा फोटो आणि सफाई केल्यांनतरचा फोटो या अॅप्लीकेशनवर अपलोड करावा लागणार आहे.शहर स्वच्छतेला प्राधान्य देणारा महापालिकेचा हा अॅप सुरू होताच घरबसल्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार आहेत.

नागरिकांच्या सेवेत मोबाइल अॅप लवकरच
^शहरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांना तक्रार दाखल करता यावी म्हणून स्वतंत्र मोबाइल अॅप तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आरोग्य निरीक्षकांची या अप्लीकेशनवर नोंदणीचे कार्य सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच मोबाइल अॅप्लीकेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. सोमनाथ शेटे, अतिरिक्त आयुक्त मनपा,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...