आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Said, Educational Institutions Will Have Autonomy

शैक्षणिक संस्थांना आता स्वायत्तता देणार : सीएम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासोबतच विकासासाठी शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे सरकारी हस्तक्षेप कमी होईल. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. डाॅ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) नवनिर्मित ग्रंथालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
डाॅ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण महर्षी म्हणून समाजाला ज्ञानयोगी बनवण्यासाठी ज्ञानयज्ञ सुरू केला त्यामुळेच शिक्षण काही निवडक लोकांची मक्तेदारी बनून राहता सर्वसामान्यांसाठीही त्याची दारे मोकळी झाली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतून वैदर्भीयांना उच्च शिक्षण उपलब्ध झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

अमरावतीत सुशिक्षितांची संख्या ८० टक्क्यांपर्यंत वाढली ही शिक्षणमहर्षींच्या प्रयत्नांमुळेच. त्यांनी शेतीला दिशा देण्याचे काम केले. देशात पहिल्या कृषीप्रदर्शनाचे आयोजन करून सामूहिक शेतीची संकल्पना मांडणारेही तेच पहिले कृषीमंत्री होते. शेतीला आधुनिकतेकडे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मतही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अॅड. अरुण शेळके होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील, खासदार आनंद अडसूळ, आमदार डाॅ. सुनील देशमुख, आमदार रमेश बुंदिले, आमदार प्रभुदास भिलावेकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि माजी राज्यपाल स्व. रा.सू गवई यांच्या पत्नी कमलताई गवई, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डाॅ. किशोल फुले यांनी केले. ‘पीडीएमसी’चे अधिष्ठाता डाॅ. दिलीप जाणे यांनी आभार मानले.

इंद्रपुरीत देवेंद्रांचे स्वागत हा विलक्षण योग : अॅड. शेळके
ज्या संस्थेला डाॅ. देशमुखांसारख्या महामानवाचे कवच प्राप्त आहे, त्या संस्थेला साधारण व्यक्तींनी कवच देण्याची आवश्यकताच नाही, असे उत्तर पीडीएमसीपुढे असलेल्या अडचणींचा पाढा वाचून मुख्यमंत्र्यांना कवच मागणाऱ्या डाॅ. शेळके यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. डाॅ. पंजाबराव प्रशिक्षण प्रबाेधिनीत अध्यासन केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा केली.

अॅड. अरुण शेळके यांनी भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे, अशी विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री संबोधनासाठी उभे असतानाच एका ज्येष्ठ व्यक्तीने त्यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची मागणी पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न करू, परंतु, ज्यांना लोकांनी मनात स्थान दिले तेच भारतरत्न आहे, असे मत मांडले.
शिवाजी शिक्षण संस्थेला मुख्यमंत्र्यांचे पाय लागले. इंद्रपुरीत देवेंद्रांचे स्वागत हा विलक्षण योग होय, असे संस्थेचे अध्यक्ष अॅड. शेळके म्हणाले. भाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे ग्रंथालय झाले. त्यांचे कार्य बघण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना संस्थेत आणण्यास प्रयत्न करावे भाऊसाहेबांना भारतरत्न मिळायला हवे. ही इच्छा पूर्ण करावी, अशी विनंती अॅड. शेळकेंनी केली.
‘पीडीएमसी’मध्ये ग्रंथालय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.