आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू : आदित्य ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - आज आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी सर्वकाही सरकारच्या भरवशावर राहून होत नाही. ज्या ठिकाणी सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी सत्तेचा वापर करूच, मात्र त्यातूनही मार्ग निघत नसेल तर त्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावरही उतरू, असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, वाशीमचे जिल्हाप्रमुख राजेश पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना हा संवाद औपचारिक असल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. या वेळी ते म्हणाले की बाळासाहेबांना अभिमान वाटेल अशी कामे शिवसेनेकडून आणि शिवसैनिकांकडून आजही करण्यात येत आहेत. आज या ठिकाणी पार पडलेला कार्यक्रमही तसाच आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना सतत कार्यरत राहिली आहे. मराठवाड्यात सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. युवासेनेच्या माध्यमातून बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. शहरी भागातील युवकांप्रमाणेच ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र, शेवटी सगळंच सरकारच्या भरवशावर राहून होत नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या परीने सर्वसामान्यांसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. या वेळी दिवाकर रावते यांनी यवतमाळ येथील बसस्थानकावर असलेल्या समस्या लवकरच निकाली निघतील, अशी माहिती दिली.