आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress MLA Rahul Bondre Beaten Nayab Tahsildar

काँग्रेस आमदार राहुल बोंद्रेंची नायब तहसीलदारांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लाभार्थीस शिधापत्रिका न दिल्याच्या कारणावरून चिखलीचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक के. बी. सुरडकर यांना मंगळवारी कार्यालयात मारहाण केली. दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ तहसील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून कारवाईची मागणी केली.

मंगळवारी सुरडकर आपल्या कक्षात काम करीत होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास आमदार बोंद्रे हे आपल्या १० ते १५ कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात आले. त्यांनी सुरडकर यांना लाभार्थींना शिधापत्रिका न देण्याचे कारण विचारले. तसेच त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर बोंद्रे यांनी सुरडकर यांना मारहाण केली. त्यानंतर बोंद्रे कार्यकर्त्यासह तहसील कार्यालयातून निघून गेले.

काम बंद आंदोलन
पुरवठा निरीक्षकांच्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर तहसील परिसरातील झाडाखाली बसून काम बंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे दुपारनंतर तहसील कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.

दरम्यान, तहसील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कुरुंदकर यांना निवेदन देऊन सुरडकर यांना मारहाण करणारे आमदार व कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली.

सुरडकर यांनी लाच मागितली: बोंद्रे
पांग्री उबरहंडे येथील एका लाभार्थीने दोन वर्षांपूर्वी शिधापत्रिका मिळण्यासाठी चिखलीच्या तहसील कार्यालयात कागदपत्रे सादर केली होती. आपल्या कामासाठी अनेकवेळा तहसील कार्यालयात चकरा मारल्या. त्यासाठी सुरडकर पैशाची मागणी करीत होते. दरम्यान, याच शिधापत्रिकेसाठी गेलेल्या महिला सरपंचांनाही सुरडकर यांनी अपमानास्पद वागणूक दिली. सरपंचासह लाभार्थींच्या तक्रारी आल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. लाभार्थीचे कागदपत्र सुरडकर यांनी हरवले, असा आरोपही आमदार बोंद्रे यांनी या वेळी केला.