आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. निवडणुकीच्या उंबरठ्यापासून ठेके ‘दार’ दूर!; कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर बाजार - जिल्हापरिषद पंचायत समितीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच शौचालय असल्याच्या प्रमाणपत्रापासून अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत असल्याने इच्छुकांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच कंत्राटदार नसल्याचेही प्रमाणपत्र सादर करण्याची भर पडल्याने संबंधित तथाकथित ठेके‘दारांची’ चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. 

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सदस्य असलेल्या अनेकांनी आतापर्यंत ठेकेदारीचा ‘धंदा’ सुरू करून आपला खिसे गरम केल्याचे वास्तव आहे. त्यातच अशा ठेकेदारांनी केलेल्या कामांचा दर्जा कुण्याही गावखेड्यात गेल्यानंतर दिसून येतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवताना संबंधित उमेदवार या संस्थांचा ठेकेदार नसावा, अशी अट घातली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना विविध सुमारे बारा प्रमाणपत्रासोबत ठेकेदार नसल्याचेही प्रमाणपत्र उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा फायदा घेऊन स्वत:च्याच तुंबड्या भरणाऱ्या अशा जनप्रतिनिधींना चाप बसणार आहे. 

नामनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारांना अनामत रकमेची पोचपावती, जातप्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शौचालयाचे प्रमाणपत्र, शौचालयाच्या प्रमाणपत्रासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल, ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडल्याचा पुरावा आदी प्रमुख कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. सध्या इच्छुकांना या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे नाकीनऊ आणणारे ठरता आहे. त्यातच ग्रामपंचायतीचा करभरणा शौचालयाचे प्रमाणपत्राने इच्छुकांच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासुन काही सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठेकेदारीसाठी वापर करून रग्गड कमाई केल्याचे चित्र ग्रामीण तालुकास्तरवार दिसून येत आहे. ठेकेदार नसल्याच्या प्रमाणपत्रामुळे अशा तुंबडीभरू इच्छुकांच्या आकांक्षेवर पाणी फेरले गेले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विविध प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सध्या इच्छुकांची ग्रामपंचायतपासून जिल्हा कचेरीपर्यंत चांगलीच धावपळ होत असल्याचे चित्र निवडणुकीनिमित्त दिसून येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...