आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy Between Navab Malic And Girish Bapat

मलिकांविरोधात बापट करणार मानहानीचा दावा, म्हणे सवंग लोकप्रियतेसाठी सर्व खटाटोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यामुळे आपली व पक्षाची नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे मलिक यांच्याविरोधात आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दावा दाखल करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेही ते म्हणाले.
दिवाळीच्या काळात सरकारने जप्त केलेली दोन हजार कोटींची तूर डाळ रेशनवर उपलब्ध न करता व्यापाऱ्यांना परत करताना गैरव्यवहार झाला असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी १०० ते २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी गुरुवारी केला होता. त्याबाबत बापट यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले.

तुरीचे पीक संपूर्ण देशात होत नाही. महाराष्ट्रातही विदर्भ व मराठवाड्यासारख्या काही भागांत तुरीचे पीक घेतले जाते. या वर्षी ऊन चांगलेच तापल्याने तूर डाळीच्या उत्पादनात घट आली. त्यातच जागतिक बाजारपेठेतही भाव वाढले. त्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला. देशांतर्गत फक्त ३० टक्के तूर डाळ उत्पादन होते. ७० टक्के डाळ आयात केली जाते. तूर डाळीच्या भाववाढीवर नियंत्रण मिळवण्याचे सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असे बापट म्हणाले.
तूर डाळीच्या हमीभावाबाबत राज्य सरकारचा विचार
कापूस आणि सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळल्याने तूर पिकाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम उत्पादनावरही झाला. शिवाय तूर पिकाला भावही मिळत नाही. हे लक्षात घेता भविष्यात तूर डाळीला हमीभाव द्यावा का? यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे बापट यांनी सांगितले. विदर्भ आणि मराठवाड्यात प्रामुख्याने तुरीचे पीक घेतले जाते. त्यात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांना तुरीचे पीक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभागातर्फे एखादी योजना सुरू करता येईल का, यावरही विचार सुरू असल्याचे बापट म्हणाले.