आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील खड्ड्यांचा पहिला उद्रेक, नगरसेविकेच्या मुलाने उपअभियंत्याच्या कानशिलात लगावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वारंवार होणाऱ्या अपघातामुळे रस्त्यावरील जीवघेणा खड्डा बुजविण्यावरुन झालेल्या वादात अंकुश डहाके यांनी उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या कानशिलात लगावल्याने शहरातील खड्ड्यांचा पहिला उद्रेक बुधवारी (१९ जुलै) रुख्मिणी नगरात झाला.
 
दरम्यान या घटनेचे महापालिकेच्या प्रशासनात तीव्र पडसाद उमटले असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मात्र प्रशासनाला खाडकन जागी येऊन यंत्रणेने दुपारपासूनच धोकादायक खड्डे बुजविण्यास सुरुवात केले अाहे, हे येथे उल्लेखनीय. 
 
शहराच्या विविध भागात भूयारी गटार योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे कार्य केले जात आहे. या दोन्ही कामांमुळे रस्त्यांची अनेक ठिकाणी भयानक अवस्था झाली आहे. रुख्मिणी नगर येथे भूयारी गटार योजनेच्या पाइपलाइनचे काम केले जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पासून सुयोग मंगल कार्यालयापर्यंत संपूर्ण रस्ता खोदण्यात आला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे तर सर्वत्र माती पसरलेली आहे. खड्ड्यामुळे रोज अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. खड्डे तसेच माती व्यवस्थित करण्यासाठी स्थानिक काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप हिवसे, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका जयश्री डहाके नूतन भूजाडे यांच्याकडून मागील पंधरा दिवसांपासून प्रशासनाकडे विनंती केली जात आहे. मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रभागातील नगरसेवकांनी रस्त्याच्या कामाच्या संथगतीबाबत नाराजी व्यक्त केली होती.

आमसभेत चर्चा होऊ शकल्याने भूयारी गटार मजीप्रा पाइपलाइनच्या विषयाला आयुक्त हेमंत पवार यांच्याकडून विशेष बैठक घेण्यात आली. मात्र त्यानंतर देखील रस्त्यावरील खड्डा बुजला नाही अन् मातीवर मुरुम देखील टाकण्यात आला नाही. दरम्यान मंगळवारी रात्री दाेन विद्यार्थिनी या खड्ड्यामध्ये पडल्याची माहिती आहे. या दोन विद्यार्थिनींनी नगरसेविका जयश्री डहाके यांचे घर गाठत तीव्र शद्बात संताप व्यक्त केला होता. या दोन्ही विद्यार्थिनींना चांगलाच जबर मार लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय नागरिकांकडून विचारणा होऊ लागल्याने नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली. 

आज सकाळी पुन्हा अपघात झाल्याने नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी शहर अभियंता जीवन सदार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर उपअभियंता सुहास चव्हाण हे सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास मंगेश कडू यांच्यासमवेश रुख्मिणी नगरात पोहचले. येथील उपाययोजना करण्याबाबत नगरसेविका जयश्री डहाके, प्रदीप हिवसे यांच्यासोबत चर्चा करीत असताना अंकुश डहाके यांनी थापडांनी मारहाण केल्याची तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नगरसेविका जयश्री डहाके यांच्या मुलगा अंकुश याने उपअभियंता सुहास चव्हाण यांना मारहाण केल्याची माहिती पोहचताच महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. या घटनेची तक्रार सुहास चव्हाण यांच्याकडून राजापेठ पोलिस ठाण्यात आली. तक्रारीच्या आधारे अंकुश डहाके विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर अंकुश डहाकेला राजापेठ पोलिसांकडून अटक करण्यात आली नव्हती.

 
महापालिकेत काम बंद : उपअभियंतासुहास चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. सर्वच कर्मचारी कार्यालयाबाहेर आल्याने महापालिकेच्या सर्वच विभागात शुकशुकाट होता. 
 
आमसभेवर बहिष्कार: शहरातीलखड्ड्यांचा विषय गाजत असताना महपालिकेच्या अभियंत्यास मारहाण करण्याची घटना घडली. महापालिकेची आमसभा गुरुवार २० जुलैला हाेणार असल्याने यात मारहाणीचे पडसाद उमटणार असल्याचे चिन्हे आहेत. अधिकारी-कर्मचारी आमसभेवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. 
 
नगरसेविकेचा अपघात: याचखड्ड्यामुळे काही दिवसांपूर्वी नगरसेविका जयश्री डहाके यांचा देखील अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मातीवरुन वाहन स्लीप झाल्याने नगरसेविका डहाके यांना दुखावत झाली होती. 
 
सदस्यत्व रद्द करण्याची मागणी: नगरसेविकेचामुलगा अंकुश डहाके याने अभियंत्यावर प्राणघातक हल्ला केल्याने कामबंद करण्याचा इशारा महापालिका कर्मचारी-कामगार संघाने दिला. जयश्री डहाके प्रदीप हिवसे यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
काळी माती टाकली : भूयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आल्यानंतर खड्ड्यामध्ये काळी माती आणून टाकण्यात आली. मात्र, माती इतरत्र पसरल्याने खड्डा कायम असून सर्वत्र चिखल निर्माण झाला. चिखलातून वाहन घसरल्याने बुधवारी (१९जुलै) सकाळी झालेल्या अपघातात जखमी झाल्याची माहिती विजय खंडारे यांनी “दैनिक दिव्य मराठी’शी बोलताना दिली. 
 
तर आजचा प्रसंग उद्भवलाच नसता 
लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत दुरूस्तीची मागणी करूनही दुरूस्ती केली जात नसेल तर तेही प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे. दररोज कुठे ना कुठे दुचाकीस्वार खरचटून तर कुठे हातपाय तोडून घेत आहे. होणारी विकासकामे स्वागतार्ह बाब असली तरी कुणाच्या जीवाचे मोल देऊन अशी कामे काय कामाची? दोन मुली चिखलात पडल्यानंतर नगरसेविकेच्या घरी जाऊन त्यांनी घेतलेले तोंडसुख यामुळे व्यथित नगरसेविकेने केलेली दुरूस्तीची मागणी रास्त आहे. मारहाणीनंतर प्रशासनाने बहुतांश खड्डे बुजवले.हेच काम १५ दिवसांपुर्वी केले असते तर हा प्रसंग उद्भवलाच नसता. 
बातम्या आणखी आहेत...