आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर ‘पीएसआय’चा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- लाचप्रकरणात अटक करण्यासाठी एसीबीचे पथक घरी येताच एका पोलिस उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने हा प्रयत्न हाणून पाडत त्याला अटक केली. ही घटना बुधवारी नागपुरात घडली. मनीष गावंडे असे या उपनिरीक्षकाचे नाव अाहे.

पाचपावली परिसरातील सावजी भोजनालयाच्या मालकाने तीन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याचे भोजनालय चालू देण्यासाठी पाचपावली पोलिस ठाण्याचा शिपाई प्रवीण जांभुळकर हा उपनिरीक्षक मनीष गावंडे तसेच सहायक उपनिरीक्षक उल्हास पवार यांच्या वतीने तक्रारदाराकडे हप्ता मागण्यासाठी गेला होता. हप्त्याची रक्कम बरीच माेठी असल्याने त्याने घासाघीस करून चार हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र, सावजी भोजनालयाच्या मालकाने ऑक्टोबर महिन्यात एसीबीकडे यासंदर्भातील तक्रार नोंदवली होती. आश्चर्य म्हणजे यानंतर तिघेही जण लाच घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. त्यामुळे सापळा रचण्यात अडचणी येत राहिल्या. दरम्यानच्या काळात फोनवर संभाषण सुरू असल्याने ते टॅप करून एसीबीने पुरावे गोळा केले. या पुराव्यांच्या आधारे बुधवारी सकाळी एसीबीचे पथक उपनिरीक्षक गावंडे यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. या पथकाला पाहताच गावंडे यांनी आपल्या खोलीत जाऊन सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढले ते अापल्याच कानाला लावले. त्या वेळी पथकातील एकाने गावंडे यांचा हात ओढल्याने रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी छताला लागली. पथकाने गावंडे यांना लगेच जेरबंद केले. गावंडे हे दीड वर्षापूर्वी पाचपावली पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपतीसह आत्महत्येच्या गुन्ह्याचीही नोंद झाली आहे. या प्रकरणात गावंडे यांच्यासोबतच सहायक उपनिरीक्षक उल्हास पवार, शिपाई प्रवीण जांभुळकर यांच्याविरुद्ध एसीबीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत.

आणखी एक जाळ्यात
आणखीएका प्रकरणात, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी ठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या नागपुरातील नंदनवन पाेलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकास एसीबीने रंगेहाथ पकडले. राजेश्वर राऊत असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेअकरा हजारांची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले.
बातम्या आणखी आहेत...