नागपूर- गेल्या वर्षी सोयाबीन व तूर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भाव कोसळल्यामुळे तोटा सहन करावा लागला. त्यानंतरही खचून न जाता राज्यभरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बीटी कापसाची लागवड केली. मात्र, कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे पीकही हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या अहवालात याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या कापूस उत्पादक क्षेत्राचा दौरा करून हा अहवाल सादर केला आहे.
यावर्षी बी. टी. कापसाच्या प्रजातीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा मारा होणार असल्याचा सावधानतेचा इशारा कृषी विभागाने दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता त्यावर थिप्स, मिलीबग, बोंडअळी, गुलाबी अळीच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात येत असल्याची गंभीर चिंता तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
जगात बोंडअळीमुळे कापसाचे उभे पीक नष्ट होत आहे. कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापर सुरू झाल्याने अमेरिकेच्या मोन्सॅटो या कंपनीने बोंडअळी रक्षक ‘बोल गार्ड’ म्हणजे बीटी कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले. भारत सरकारने २००४ मध्ये बीटीच्या सरसकट वापराची परवानगी मोन्सॅटोला प्रति ४५० ग्रॅमच्या संकरित बियाण्यांच्या मूळ किमतीच्या चौपट किंमत आकारून दिली. सुरुवातीला कीटकनाशकाच्या वापरात घट आली व देशात कापसाचे विक्रमी उत्पादन आले. मात्र, २००८ पासून उत्पादन घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बीटी कापसावर थिप्स, मिलीबग, बोंडअळी, गुलाबी अळीचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. यामुळे कृषी विभागाने राशी कंपनीच्या बीटी बियाण्यावर बंदी घातली. मात्र, यावर्षी मोन्सॅटोचे बोंडअळी रक्षक बोल गार्ड हे तंत्र अळीतील विषाणूवर निरोधकता आल्यामुळे पूर्णपणे अयशस्वी होत असल्याचा आरोप तिवारींनी केला.