आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस ५८००,खरेदी मात्र ५५०० रुपयाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -  खासगी बाजारात कापसाचे दर वधारले असले तरी सध्या याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री थांबवली आहे. बाजारात सरासरी ५६०० ते ५७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असले तरी ग्रामीण भागात मात्र बाजार समितीचा परवाना नसलेल्या खरेदीदारांकडून सरासरी ५५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे. कापूस पणन महामंडळाच्यावतीने कापसाची खरेदी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील कापूस खासगी जिनिंगवर विकला जातो. परंतु हा कापूस थेट शेतकरी जिनिंगवर विक्री करीत नसल्यामुळे भाववाढीचा फायदा ग्रामीण भागातील खरेदीदारांना मिळतो. थेट जिनिंगवर कापूस नेण्याच्या सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे सरासरी दोनशे ते तिनशे रुपये तोटा सहन करून ग्रामीण भागातील खरेदीदारांना कापसाची विक्री करावी लागते. जिल्ह्यात सध्या कापसाचे सरासरी दर ५६०० ते ५७०० रुपये असताना ग्रामीण भागात खरेदीदार सरासरी ५५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. यामुळे सध्याचा असलेला भाव शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीच थांबवली आहे. 
 
अशी होते ग्रामीण भागात कापसाची खरेदी: ग्रामीणभागात शेतकऱ्यांकडून २० किलोच्या वजनाने साध्या तराजूने कापूस मोजून घेतला जातो. त्यातच वजन वाढवण्यासाठी ग्रामीण भागातील खरेदीदार मोठ्या प्रमाणात फवाऱ्याच्या पंपाने पाणी मारून कापूस ओला करतात. यामुळे सरकी फुगून त्याचे वजन वाढण्यास मदत होते. यात वजनातही गोलमाल केली जाते. परंतु खरेदीदार ज्यावेळी जिनिंगवर कापूस विकतो त्यावेळी त्याचे वजन मात्र इलेक्ट्रॉनिक प्लेट काट्यावर केले जात असल्याने या व्यापाऱ्यांना चांगलाच फायदा होतो. जिनिंगवरही बड्या खरेदीदारांचे ग्रामीण भागातील खरेदीदारांसोबत दैनंदिन व्यवहार असल्यामुळे किरकोळ घट घेतली जाते. परंतु शेतकऱ्यांकडे मजूरांची टंचाई, वाहतूकीची साधने नसल्यामुळे शेतकरी या खरेदीदारांनाच कापसाची विक्री करतात. या खरेदीदारांकडे बाजार समितीचा कोणताच परवाना नसताना ही अवैध खरेदी केली जाते. यावर बाजार समिती संबंधित यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसल्यामुळे शेतकऱ्यांना अशा खरेदीदारांकडून फसवणूक झाल्यास कायदेशीर दाद मागणेही कठीण होऊन बसते. दरम्यान, थेट समानानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. 

कापसाचे दर 
अमरावती ५६००-५६५० 
अंजनगाव सु. ५६५०-५७०० 
दर्यापूर ५६००-५६५० 
धामणगाव रेल्वे ५५००-५५८० 
परतवाडा ५६००-५६२५