आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीपींनीच मध्यरात्री उठवले ‘ऑन ड्युटी’ झोपलेल्या पोलिसाला, दोन पोलिसांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात चोरटे सुसाट सुटले होते. ठाणे स्तरावर पोलिसांना चोऱ्या रोखणे जमले नाही. अखेर ‘डीआयजी’ दर्जाच्या पोलिस आयुक्तांना रस्त्यावर उतरून रात्र गस्तीची सर्व सूत्रे स्वत:कडे घ्यावी लागली. त्यामुळेच मागील चार दिवसांपासून शहरात मोठी घरफोडी किंवा चोरी झाली नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त रस्त्यावर असल्यामुळे पोलिसही आता मन लावून गस्त घालत आहे. मात्र मध्यरात्रीच्या वेळी ठाण्यांमध्ये काय सुरू असते, हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्त गुरुवारी रात्री कोतवाली ठाण्यात अचानक पोहोचले. त्यावेळी लॉकअप गार्डवर असलेला पोलिस कर्मचारी झोपेत होता. पोलिस आयुक्तांनी त्या पोलिसाला उठवले. तत्पूर्वी, त्या पोलिसाच्या बाजूने असलेली रायफल घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु साखळीने बांधून त्याला कुलूप लावून ठेवले होते. मात्र ऐनवेळी रायफलला लावलेल्या कुलपाची चावी सुद्धा दिसत नव्हती. हा गंभीर प्रकार असल्यामुळे या प्रकरणात दोघांवर कारवाई होणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी सांगितले आहे.
 
कोतवाली पोलिस ठाण्यात असलेल्या लॉकअपमध्ये कोतवाली ठाण्यासह गाडगेनगर, खोलापुरी गेट, नागपुरी गेट तसेच गरज भासल्यास राजापेठ ठाण्याचे आरोपीसुद्धा ठेवले जातात. त्यामुळे या ठिकाणी लॉकअप गार्डवर चोवीस तास पोलिस कर्मचारी तैनात असतात. त्यांना ‘संत्री’ म्हणतात. दरम्यान, गुरुवारी रात्री कोतवालीच्या लॉक अपमध्ये नागपुरी गेटच्या आरोपीसह एकूण तीन आरोपी होते. त्यामुळे नागपुरी गेट ठाण्याला नेमणुकीस असलेल्या पोलिस नाईक मनोहर सहस्त्रबुद्धे यांची कोतवालीमध्ये ‘संत्री’ ड्युटी होती. तर एएसआय दिगांबर अंबाडकर हे ‘लॉकअप गार्ड’चे इन्चार्ज होते. गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्तांनी त्यांच्या ताफ्यासह कोतवाली ठाण्यात आकस्मिक भेट दिली. यावेळी संत्री असलेले सहस्त्रबुद्धे टेबलवर मान ठेवून झोपले होते.

1० ते १५ जण एकाच वेळी त्यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले तरीही त्यांना जाग आली नव्हती, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. दरम्यान संत्रीजवळ सुरक्षेसाठी रायफल राहते, ही रायफल उचलण्याचा पोलिस आयुक्तांसोबत असलेल्या पोलिसांनी प्रयत्न केला असता रायफल टेबलला साखळीच्या सहाय्याने कुलूपबंद करून ठेवली होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्या कुलपाची चावी कुठे आहे, असा प्रश्न केला मात्र ऐनवेळी चावी मिळाली नाही, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्यानंतर स्वत: पोलिस आयुक्तांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसह गस्त सुरू केली आहे.
 
संत्री, लॉकअप गार्डवर होणार कारवाई : पोलिस दल रात्र गस्तीवर थंडीत शहरात फिरत आहे. दुसरीकडे मात्र लॉकअप गार्ड सारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलिस झोपत आहे. त्यामुळे संत्री लॉकअप गार्ड इन्चार्जवर कारवाई होणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. रात्रीच पोलिस आयुक्तांनी गाडगेनगर ठाण्यातही भेट दिली.
 
बातम्या आणखी आहेत...