आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळणाघरांसाठी सर्वंकष धोरण आखणार : रणजित पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : खारघर येथ पूर्वा पाळणाघरात अफसाना शेख या आयाने १० महिन्यांच्या बाळाला अमानुषपणे मारहाण केली होती. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत शुक्रवारी उमटले.
यावर या प्रकरणाची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाची सहायक पोलिस आयुक्तांच्या वतीने चौकशी करण्यात येईल.
तसेच महिला व बालविकास विभागाच्या मदतीने पाळणाघरांसाठी सर्वंकष धोरण आखले जाईल, अशी घोषणा राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह रवींद्र फाटक, जोगेंद्र कवाडे, डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बाळाची आई २३ नोव्हेंबरला खारघर ठाण्यात गेली होती. मात्र, पोलिसांनी आरोपींविरुद्ध तक्रार घेण्यास दिरंगाई केली. बाळाला फ्रॅक्चर असल्याचे आढळून आल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केले. तसेच राज्यातील पाळणाघरांत मुलांच्या संगोपनाबाबत निर्माण झालेली अविश्वासाची भावना या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.
पोलिसांनी केलेली दिरंगाई हा अक्षम्य गुन्हा असल्याने संबंधित सहायक पोलिस निरीक्षकाला तत्काळ निलंबित करायला हवे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली. या घटनेनंतर आपण बाळाचे आईवडील तसेच नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.
या वेळी त्यांनीही पाळणाघरांची नोंदणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या सूचना आपणास योग्य वाटत असून त्या दृष्टीने सरकारने कार्यवाही करायला हवी, अशी सूचनाही गोऱ्हे यांनी मांडली.
सभापती रामराजे निंबाळकर यांनीही हा राज्याच्या दृष्टीने संवेदनशील विषय असल्याचे स्पष्ट करत आपण काही निर्देश देत असल्याचे सांगितले. पाळणाघरांमधील काम करणाऱ्या आया कौशल्य प्रशिक्षित असाव्यात.
याशिवाय त्यांना नोकरी दिली जाऊ नये. मुख्य म्हणजे पाळणाघरे चालवणाऱ्या संचालकांसाठी नियम बनवणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचे सरकारला अधिकार असावेत. याचबराेबर मार्च अधिवेशनापूर्वी सहायक पाेलिस निरीक्षकाला निलंबित करा, अशा सूचना निंबाळकर यांनी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...