आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरा घे तुला हा अखेरचा सलाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चौतीस वर्ष भारतीय लष्करात देशाची सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या वडिलाने विरगती प्राप्त पुत्रास ताठ मानेने अखेरचा सॅल्यूट’ ठोेकला तेव्हा उपस्थित असलेले हजारो डोळे आपसुकच पाणावले. त्यावेळी सर्वांच्या नजरा या हेलावलेल्या क्षणी पंजाबचे वडील जानराव उईके यांच्यावर खिळल्या होत्या. नांदगाव खंडेश्वरच्या पंजाब उइके यांच्या पार्थिवावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मानवंदना देणाऱ्यांमधील अनेक हातांपैकी माथ्यावर गेलेला एक हात होता वडील जानराव उईके या माजी सैनिकाचा. सैनिक असलेल्या वडिलाच्या खांद्यावरच शहीद विरपुत्राचे पार्थिव अंत्यविधीकरीता नेण्याचा हा प्रसंग बघून हजारो चाहत्यांनी ‘शहीद पंजाब अमर रहे ’चा नारा लावत पाकिस्थानचा जोरदार निषेध केला. ‘अमर रहे अमर रहे, शहीद पंजाब अमर रहे’ असा प्रचंड जयघोष करण्यात आला. पंजाबचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील अलोट जनसागर नांदगाव खंडेश्वरमध्ये लोटला होता. मंगळवारी सकाळपासून गावात प्रत्येक घरासमोर सडा सारवण करून मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. देशाच्या सिमेवर शहीद झालेल्या पंजाबला अखेरची सलामी देण्यासाठी गावकऱ्यांनी आकर्षक रांंगोळ्या काढून या विरपुत्राला आदरांजली वाहली. रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास जम्मू काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ वर्षीय पंजाब शहीद झाल्याची बातमी सोमवारी सकाळी पहाटे नांदगावमध्ये धडकली होती. मात्र सोमवारचा संपूर्ण दिवस पार्थिव नांदगांव येथे पोहोचले नाही. काश्मिर येथून निघालेले पार्थिव मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास गावात पोहोचले. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे मंगळवारी पंजाबवर लष्करी इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची लष्करी मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हजारोच्या उपस्थितीत पंजाबच्या भावाने चितेला भडाग्नी दिला.
दुपारी१२ वाजता पोहोचले पार्थिव : बेलोराविमानतळावरून दुपारी १२ च्या सुमारास पंजाबचे पार्थिव नांदगांव खंडेश्वर येथे पोहोचले. तेव्हा लष्कराच्या विशेष पथकामधील कॅप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एन.पी. जीवन, फ्लाइट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांनी संचलन करीत ओंकारखेडे भागात असलेल्या राहत्या घरी पार्थिव पोहोचते केले. लष्कराच्या विशेष वाहनातून हे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टरवर साकारण्यात आलेल्या ‘स्वर्ग रथातून’ पंजाबची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

राज्य शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण : महाराष्ट्रशासनाच्या वतीने पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शहीद पंजाब उईके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने कॅप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एल.जी.ढोले, नायक सुभेदार एन.पी.जीवन तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाब उईके यांचे वडील आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक जानराव उईके यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडुन शहीद पंजाब उईके यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शहीद पंजाब यांची आई बेबीताई उईके, बहीण प्रिती इरपाते, लहान भाऊ, जावई गजानन इरपाते, खा.रामदास तडस, आ.डॉ.अनिल बोंडे, आ.बच्चु कडू, आ.वीरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले. रत्नाकर चरडे, उप विभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार वाहुरवाघ, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजगडकर, कॅप्टन आशिष चंदेल, राष्ट्रसेविका समितीच्या मधुरा पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक चंद्रशेखर भोंदु, निवेदिता दिघडे-चौधरी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. नांदगाव खंडेश्वर पंचक्रोशितील सुमारे दहा हजारांच्या वर जनसमुदाय उपस्थित होता. शहीद पंजाब उईके यांच्या पार्थिवास त्यांच्या लहान बंधूंनी भडाग्नी दिला. त्यानंतर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायांनी दोन मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर शेवटी सामूहिक राष्ट्रगीत झाले.

‘त्या’ घराकडे जाणारे रस्ते सजले हाेते रांगोळ्यानी
३० तासांहुन अधिक काळ पार्थिवाची प्रतिक्षा करणाऱ्या हजारो चाहत्यांचे पाउले ओंकारखेडा परिसरात असलेल्या पंजाबच्या घराकडे वळले होते. पंजाबच्या घराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. गावात सर्वत्र देशभक्तीवर गिते ऐकू येत होते. ठिकठिकाणी पंजाबला श्रद्धांजली वाहणारे पोस्टर आणि बॅनर्स झळकत होते. ओंकारखेडा परिसरात गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली हाेती. अंत्ययात्रेत सामील होऊन हे सर्व चाहते अंत्यसंस्कारासाठी लाखानी मैदानावर जमले. अंत्यदर्शनाकरीता काही काळ पार्थिव लाखानी मैदानावर ठेवण्यात आले होते. दुपारी वाजताच्या सुमारास पंजाबच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...