आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवलग मित्रानेच केला आरोग्य सेवकाचा खून, अर्वाच्य शिवीगाळ केल्याने राग झाला अनावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मेळघाटातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेल्या संतोष गणेश ढगे (३५, रा. सावनेर) यांचा खून त्यांच्या जिवलग मित्रानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अवघ्या १२ तासांत त्याला शोधून अटक केली आहे. दादाराव रंगरावजी हंबर्डे (३८, रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर), असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.
दादाराव हा मृतक संतोष ढगे यांचा बालपणीपासूनचा मित्र आहे. दोघेही एकाच वर्गात शिकले आहे. दरम्यान, संतोष ढगे आरोग्य सेवक म्हणून हरिसालला कार्यरत होते. शनिवारी (दि. १३) सायंकाळी ढगे गावाला जाण्यासाठी बडनेरा पोहोचले. मात्र, उशीर झाल्यामुळे गावाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती. म्हणून त्यांनी गावातीलच आपला जिवलग मित्र दादाराव हंबर्डेला फोन करून बोलवले. हंबर्डे बडनेरात पोहोचला. सायंकाळी वाजताच्या दरम्यान हे दोघेही गावाला जाण्यासाठी बडनेरावरून निघाले. हे दोघे अंजनगाव बारी मार्गे जात होते. याच रस्त्यात पार्डीच्या पुलाजवळ दोघेही लघुशंकेसाठी थांबले. त्या वेळी दादाराव हंबर्डेनी संतोष ढगे यांना विचारले की, तू गुरुवारीच हरिसालला गेला होता, दोन दिवसांतच कसा काय परत आला? या प्रश्नावर ढगे यांनी दिलेले उत्तर आणि त्यानंतर दादारावला केलेली अर्वाच्य शिवीगाळ, मानहानिकारक वक्तव्यामुळे दादारावचा राग अनावर झाला. त्याने त्याच ठिकाणचा दगड घेऊन संतोष ढगेंच्या डोक्यात घातला. या दगडामुळे ढगे गंभीर अवस्थेत त्याच ठिकाणी पुलाखाली पडून राहिले. ही घटना घडल्यानंतर दादाराव घरी गेला मोबाइल बंद करून झोपी गेला. घटनेनंतर सहा दिवसांनी पोलिसांना या ठिकाणी मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच बडनेरा पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पोलिसांना मृतदेहाची ओळख पटताच सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे त्यांच्या पथकाने मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सुरूवात केली. संतोष ढगेंच्या ज्या ठिकाणी जाणे येणे होते, त्या व्यक्तींची विचारपूस केली असता, १३ फेब्रुवारीला त्याला बडनेरात घेण्यासाठी दादाराव हंबर्डे गेल्याचे पोलिसांना समजताच त्याला शुक्रवारी सायंकाळीच ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता अवघ्या काही मिनीटातच दादारावने पोलिसांना आपबिती कथन करून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. एका जिवलग मित्रानेच केलेल्या या क्रृर कृत्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मोरकऱ्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, एपीआय कांचन पांडे, एएसआय दिलीप वाघमारे, चैतन्य रोकडे, संजय बाळापुरे, प्रशांत बडनेरकर, धिरज जोग, संतोष रौराळे, नीलेश जुनघरे, संग्राम भोजने, मनीष गवई, दर्शना वानखडे यांनी कारवाई केली.
ब्रेव्हो!क्राईम ब्रँच, सायबर सेल : मागीलकाही दिवसांपासून शहर पेालिसांनी गुन्हे उघड करून आरोपींना पकडण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान चार दिवसांपुर्वीच सायबर सेलचे एपीआय पांडे , एपीआय पठाण त्यांच्या चमूने तूर सोयाबिन चोरणारी चौकडी गजाआड करून त्यांच्याकडून चोरीचे ४२ पोते तूर सोयाबिन जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी झालेला खून अवघ्या १२ तासांत उघड करून आरोपीला अटक केली. या कामगिरींमुळे शहर पोलिसांची, गुन्हे शाखेची तसेच सायबर सेलची कामगिरी समाधानकारक असल्याची चर्चा आहे.