आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजयुमोच्या उपाध्यक्षाने दमदाटी करत जाळली प्राध्यापकाची कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने शेजारी राहणाऱ्या प्राध्यापकाला दमदाटी करून त्याची कार जाळल्याची घटना नागपुरात गुरुवारी घडली. या प्रकरणी सुमीत ठाकूर विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुमीतवर यापूर्वीही काही गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, भाजपची सत्ता आल्यामुळे ठाकूरची दादागिरी वाढली असल्याच्या बातम्या झळकताच पक्षाने त्याची पक्षातून तत्काळ हकालपट्टी केली. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे.

शहरातील प्रेरणा कॉलनीत प्रा. मल्हारी मस्के (वय ५०) व सुमीत ठाकूर शेजारी शेजारीच राहतात. दोन दिवसांपूर्वी सुमीत घरातून कार काढत असताना त्याच्या गाडीची मस्के यांच्या गाडीला धडक बसली. त्यामुळे सुमीत ठाकूर हा मस्केंकडे नुकसान भरपाई मागू लागला. मात्र आपली काहीच चूक नसल्याने भरपाई देणार नसल्याचे मस्केंनी सांगितले. मात्र सुमीतने मस्के यांना व त्यांच्या सासूबाईंना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मस्के यांनी पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी मस्केंनाच तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला हाेता. सुमीत हा सत्ताधारी भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे पोलिसांनी आधी हे प्रकरण तिथेच दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार दाखल करण्यासाठी मस्केंनी हट्टच धरल्यामुळे अखेर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत त्यांच्या संरक्षणासाठी दोन पोलिस शिपाई तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, गुरुवारी सकाळी सुमीत ठाकूर व त्याच्या साथीदारांनी मस्के यांची घरासमाेर उभी असलेली कार लोखंडी रॉडने फोडली आणि जाळली. यात गाडीचे प्रचंड नुकसान झाले. या वेळी मस्केंच्या घराबाहेर दाेन पाेलिस तैनात हाेते, मात्र त्यांनी सुमीतला विराेध केला नाही, असा आरोप होत आहे. सुमीत हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न अशाप्रकारची बारा गुन्हे दाखल आहेत. तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला. एक वर्षांपूर्वी तो जामिनावर कारागृहाबाहेर आला होता. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून व देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद नागपूरला मिळाल्यापासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच पक्षाचेच पदाधिकारी सत्तेच्या मस्तीत सामान्य नागरिकांना दमदाटी करू लागले आहेत.
सुमीतच्या वडिलास अटक
याप्रकरणी पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून सुमीतच्या वडिलांनी आपल्याला धमावल्याची तक्रार मस्के यांनी दिली होती. त्यानुसार सुमीतचे वडील राजकुमार ठाकूर यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.