आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी सळयांची हेराफेरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, माल खरेदी करणारा फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- लोखंडीसळया तयार करणाऱ्या कंपनीतून निघालेल्या वाहनात पूर्वीपासून क्षमतेपेक्षा अधिक सळया भरून त्या एका ठिकाणी उतरवून लाखो रुपयांची हेराफेरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या पथकाने ३१ डिसेंबरच्या रात्री नागपूर- हैद्राबाद हायवेवरील साई स्मरण ढाब्यावर केलेल्या या कारवाईत भगवानसिंह भैरुसिंह कार वय ३४ वर्षे, अब्दुल जब्बार उस्मान वजीर वय ३५ वर्षे दोघेही रा. मेहतपूर जिल्हा उज्जैन, मध्यप्रदेश संदीप केशव मेश्राम वय ३५ वर्षे रा. रामखेड ता. नेर या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर हेराफेरी करून गोळा केलेला हा माल खरेदी करणारा खरीददार फरार झाला आहे. या आरोपींच्या अटकेमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

कंपनीतून निघालेल्या लोखंडी सळाया भरलेल्या ट्रकमधून काही माल हैद्राबाद- नागपूर हायवेवर असलेल्या आणि नेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई स्मरण या ढाब्यावर उतरवण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमारसिंह आणि एलसीबीचे पोलिस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू, जमादार ऋषी ठाकूर, संजय दुबे, वासू साठवणे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघण, सचिन हुमने आणि अक्षय खडसे यांच्या पथकाने ३१ रोजी सायंकाळपासून सापळा रचला. त्यात मध्य प्रदेशातून आलेल्या ट्रक क्रमांक एम. पी. ०९ एचजी ६४३६ मधून ढाब्यावर लोखंडी सळया काढून ठेवताना ट्रकचालक भगवानसिंह आणि क्लिनर अब्दुल याला रंगेहात पकडण्यात आले. या ढाब्याचा व्यवस्थापक संदीप यालाही ताब्यात घेण्यात आले.

एका मोठ्या रॅकेटची शक्यता
याप्रकरणातताब्यात घेण्यात आलेला संपूर्ण माल आणि संशयित यांना नेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अद्याप ढाब्याच्या मागे पडून असलेल्या मालाबाबत नेमकी माहिती ते देवु शकलेले नाही. त्यामुळे हे एक मोठे रॅकेट असून त्यात आणखी बरेचजण सहभागी असण्याची शक्यता आहे.

असा आहे जप्त केलेला माल
यापथकाने त्या ठिकाणी आलेल्या ट्रकमधून ११ टन ७०० किलो लोखंडी सळया आणि ढाब्याच्या मागच्या बाजूला ठेवून असलेला १२ टन २०० किलोचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात लोखंडी पत्रे आणि टन्स केबलचाही समावेश आहे. या केबल महागड्या असून पूल तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो.

अशी आहे हेराफेरीची पद्धत
एखाद्या कंपनीतून माल निघते वेळी त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांशी साटेलोटे करुन पहिलेच ट्रकमध्ये जास्तीचा माल भरण्यात येतो. त्यानंतर तो माल या ठिकाणी धाब्यावर अल्प किमतीत उतरविण्यात येतो. अशा काही ट्रकमधून काढलेला माल ट्रक भर झाला की, खरीददार त्या ठिकाणी येऊन माल नेवून काळ्या बाजारात त्याची विक्री करतो. अशा पद्धतीने ही हेराफेरी सुरू राहते.

पोलिस पथकाने कारवाई केल्यानंतर टोळक्याकडून जप्त केलेला माल वाहने. त्यानंतर ह्या सळया ट्रकमध्ये भरून नेर येथे नेण्यात आले.