आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी मुलीला १०० फूट खोल विहिरीत दिले ढकलून, तीन महिला आरोपींसह युवकाला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा- प्रियकराशी लग्न करता श्रीमंत मुलासोबत लग्न लावून देतो, असे आमिष दाखवणाऱ्या महिलांना नकार दिल्यामुळे संतप्त महिलांनी एका सतरा वर्षीय आदिवासी मुलीला सुमारे शंभर फूट विहिरीत ढकलून दिल्याची घटना बहिरम (ता. चांदूरबाजार) शिवारात बुधवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
दरम्यान, गुराख्यांच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीला वाचवण्यात यश आले आहे.याप्रकरणी करजगाव येथील आरोपी नईम अब्दुल्ला अजीज (वय २१), शे. शौकत शे. सरदार (वय ५५), सुमय्या परवीन (वय ४५), मुन्नीबाई मन्नाराम उईके (वय ४५) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला उपचारासाठी अमरावतीला पाठवण्यात आले आहे.

चांदूर बाजार तालुक्यात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे संत्रा तोडणीसाठी मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या गावांमधून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर संत्रा तोडणीसाठी आणले जातात. भसदैही (जि. बैतुल) तालुक्यातील पीडित सतरा वर्षीय मुलगी मागील दोन-अडीच वर्षांपासून करजगाव परिसरात संत्रा तोडणीच्या कामाला येत असे.
दरम्यान, तिचे करजगाव येथील संत्रा तोडीवर असलेल्या नईम अब्दुल्ला अजीज यांच्याशी सुत जुळले. दरम्यान, आरोपी नईम अब्दुल्ला अजीज याने पीडित मुलीला सोमवारी (दि. १५) तिच्या गावावरून करजगाव येथे बोलावले. ती करजगाव येथे आल्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आपण दोघेजण संत्रा तोडीवर दुसरीकडे जाऊ असे म्हणून नईमने तिला आपल्या घरी रात्रभर राहण्यासाठी सांगितले. परंतु सदर तरुणीने नकार दिला. त्यामुळे नईमने मुलीला भालेवाडी परिसरातील आरोपी मुन्नीबाई उईके हिच्या घरी ठेवले. दुसऱ्या दिवशी नईम पुन्हा मुलीला घेण्यासाठी गेला असता त्याला ती तेथे आढळून आली नाही. दरम्यान, आरोपी शे. शौकत शे. सरदार मुन्नीबाई उईके यांनी मुलीला नईमसोबत लग्न करता तुझे आम्ही चांगल्या श्रीमंत घरातील मुलासोबत लग्न लावून देतो, असे आमिष दाखवले. परंतु मुलीने दुसऱ्या मुलासोबत लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या या दोन्ही महिलांनी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास तिला बुधवारी बहिरम शिवारातील संदीप सोलव यांच्या विहीरजवळ आणले शंभर फूट खोल असलेल्या विहिरीत ढकलून दिले. यावेळी विहिरीत अंदाजे २० ते २५ फूट पाणी असल्याची माहिती आहे. मुलगी मृत झाल्याचा समज करून दोन्ही महिला आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दुपारच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या मुलांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीत पाहिले असता मुलगी आढळून आली. त्यांनी घटनेची माहिती शेतमालक संदीप सोलव यांना दिली. सोलव यांनी पाच वाजताच्या सुमारास सहकाऱ्यांच्या मदतीने मुलीला जखमी अवस्थेत विहिरीतून बाहेर काढून शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, पीडित मुलीच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. घटनेचा तपास ठाणेदार विलास चौगुले, उपनिरीक्षक राजू इंगळे, सहायक उपनिरीक्षक दिलीप वानखडे, सचिन भुजाडे, राहूल गौरखेडे, रामरती भिलावेकर करीत आहेत. घटनेची माहिती मुलीच्या पालकांना देण्यात आली असून तेही करजगाव येथे दाखल झाल्याची माहिती आहे.मुलींना पळवणारेरॅकेट सक्रिय! : चांदुरबाजार तालुक्यात मुलींची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी माधान येथील अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये विक्री करण्यात आली होती.

चौकशी सुरू आहे
मुलीलाआरोपींनीका विहिरीत ढकलून दिले याबाबत अद्याप तपास करण्यात येत आहे. चौकशीअंती तथ्य समोर आल्यानंतर खरी माहिती उघडकीस येईल. विलास चौगुले, ठाणेदार,शिरजगाव कसबा.

२५ फूट पाण्यात राहिली तब्बल सहा तास जिवंत
संदीप सोलव यांची विहीर अंदाजे शंभरफुटापेक्षा अधिक खोल आहे. परिसरातील विहिरीत सुमारे २५ ते ३० फूट पाणी आहे. विहिरीत ढकलून दिल्यानंतर सदर मुलगी तब्बल सहा तास मशीनच्या पाईपला धरून होती. विशेष म्हणजे एवढ्या खोल असलेल्या तुलनेने अरूंद विहिरीत पीडित मुलगी जीवंतच कशी राहिली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विहिरीत जीवंत बचावलेल्या मुलीमुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशीच चर्चा परिसरात होती.