आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटमध्ये नियुक्त अारोग्य सेवकाचा खून, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावत- अंजनगाव बारी ते पार्डी मार्गावरील पुलाखाली शुक्रवारी (दि. १९) सकाळी एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे सुरुवातीला काही वेळ ओळख पटली नव्हती. दरम्यान, हा व्यक्ती नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर येथील रहिवासी असून मेळघाटात आरोग्य सेवक म्हण्ून कार्यरत होता. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
संतोष गणेशराव ढगे (३५, रा. सावनेर, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृतकाचे नाव आहे. ढगे हे मेळघाटातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदावर कार्यरत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अंजनगाव बारीवरून पार्डीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका पुलाखाली एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बडनेरा गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोलिसांना ओळख पटवण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. दरम्यान, मृतदेहाच्या अंगावरील कपड्यात एक चिठ्ठी मिळाली, या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत झाली. दरम्यान, ढगे यांच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क करून त्यांना घटनास्थळी बोलवले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यामुळे पोलिसांची खात्री पटली. मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय पोलिसांनी घेऊन वैद्यकीय यंत्रणेला त्याच ठिकाणी पाचारण करण्यात आले.
दुपारी मृतदेह त्यानंतर नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून मृतकाच्या डोक्यात चेहऱ्यावर दगडाने जबर वार केले आहे, त्यामुळे मृत्यू झाला आहे. नऊदिवसांपूर्वी निघाले होते घरून : ढगेहे हरिसालला कार्यरत होते. ते ११ फेब्रुवारीला सावनेरवरून हरिसालला जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर शनिवारी (दि. १४) हरिसालवरून सावनेरला येण्यासाठी निघाले. मात्र, त्यानंतर ते घरी पोहोचले नाही. त्यांना कोणी मारले, का मारले, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीय आहे. ढगे यांच्या मागे आई, पत्नी तसेच एक मुलगा एक मुलगी आहे.

मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. मृतकाच्या डोक्याला चेहऱ्यावर गंभीर वार असून त्यामुळेच मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर पुढे आले. त्यामुळे आम्ही अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खून पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करत आहे. विजय साळुंके, ठाणेदार,बडनेरा.