आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर महिलेने मारली "इओं'ना थापड, खासगी कक्षातील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वीस वर्षांपूर्वी बडतर्फ झालेल्या एका शिक्षकाने मागील चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २८) याच विषयावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी चर्चेसाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांना बोलावले होते. दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेतच अध्यक्षांच्या खासगी कक्षात चर्चा सुरू असताना अचानक एक महिला आली, आपण या प्रकरणात काय केले, अशी विचारणा करून तिने डॉ. पानझाडे यांना थापड मारली. हा प्रकार घडला त्या वेळी जि. प. अध्यक्षांसह जिल्हा परिषदेचे तीन सदस्यसुद्धा बसले होते. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून, जि. प. कर्मचारी अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून, अटकसुद्धा करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेले मदन शेळके नामक शिक्षकाला १९९६ मध्ये जिल्हा परिषदेने बडतर्फ केले आहे. दरम्यान, मदन शेळके सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याच प्रकरणात माहिती घेण्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांनी प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांना कक्षात बोलावले होते. डॉ. पानझाडे जिल्हा परिषदेत आले. त्या वेळी अध्यक्षांच्याच खासगी कक्षात (अँटी चेम्बर) शिक्षणाधिकारी पानझाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन सिंघवी, उमेश केने, मोहन पाटील तसेच याच विषयावर चर्चा करण्यासाठी पाटील आले होते. या मंडळींची खासगी कक्षात चर्चा सुरू असतानाच दोन महिला काही पुरुष अध्यक्षांच्या खासगी कक्षात जबरीने घुसले. या वेळी ती महिला पानझाडे कुठे आहे, असे विचारतच या प्रकरणात आतापर्यंत काय केले, असे म्हणत थेट पानझाडे यांच्या दिशेने गेली. त्यांच्या हातात असलेले याच प्रकरणातील काही कागदपत्र घेऊन त्याच ठिकाणी फाडले.

इतक्यावरच ही महिला थांबली नाही तर तिने शिक्षणाधिकारी पानझाडे यांच्या श्रीमुखात लगावली. हा प्रकार अगदी काही क्षणातच घडला. कारण त्याच ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष इतर तीन सदस्य बसले होते. ते उभे होईपर्यंत हा प्रकार संपला होता. शिक्षणधिकाऱ्यांना मारहाण करून ही महिला तिच्यासोबत असलेली एक महिला तातडीने त्या कक्षातून बाहेर निघाल्या जिल्हा परिषदेच्या बाहेर निघून गेल्या. या गंभीर प्रकरणाची माहिती संपूर्ण जिल्हा परिषदेत वाऱ्यासारखी पसरली. मारहाण कोणी केली, ती महिला कोण? हीच चर्चा गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदमध्ये सुरू होती. कारण मारहाण करणारी महिला शिक्षणाधिकारी पानझाडे यांच्याही ओळखीची नव्हती. मात्र, ती मदन शेळके यांच्या प्रकरणात आली असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेत असलेले इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी अध्यक्षांच्या दालनासमोर गर्दी केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तसेच या प्रकरणात शिक्षणाधिकारी डाॅ. पानझाडे यांनी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी एका महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

कक्षामध्ये महिलेने केली मारहाण
आपल्याला अध्यक्षांनी चर्चेसाठी बोलावले होते. त्यामुळे बडतर्फ शिक्षक मदन शेळके यांच्याच प्रकरणाची आम्ही चर्चा करत होतो. त्याच वेळी दोन महिला काही व्यक्ती जबरीने दालनात आले. त्यापैकी एक महिला ओरडतच आली, पानझाडे कुठे आहे. दरम्यान, ती महिला थेट माझ्या दिशेने आली तिने माझ्या हातातील महत्त्वाचे कागदपत्र हिसकावून घेऊन फाडले मला मारहाण केली. या प्रकरणाची आपण पोलिसांत तक्रार दिली. डाॅ. श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी(प्राथमिक).

चर्चेदरम्यान घडला प्रकार
बडतर्फशिक्षकमदन शेळके यांच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आपणच शिक्षणाधिकारी डाॅ. पानझाडे यांना बोलावले होते. खासगी कक्षात आमची चर्चा सुरूच असताना दोन महिला जबरीने कक्षात आल्या. त्यापैकी एकीने शिक्षणाधिकाऱ्यांच्या हातातील पेपर फाडले तसेच त्यांना थापड मारली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सतीश उईके, जि.प.अध्यक्ष.

गुन्हा नोंदवून केली महिलेस अटक
डॉ.पानझाडेयांनी तक्रार दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून महिलेविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमकी देणे तसेच अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करून महिलेला अटकसुद्धा करण्यात आली आहे. कैलाश पुंडकर, ठाणेदार,गाडगेनगर.
गाडगेनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले डाॅ. पानझडे इतर.