आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसपींनी लावला आणखी दोन गुन्हेगारांविरुद्ध मोक्का,वर्षभरात तिसरी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांविरुद्ध पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी काही दिवसांपूर्वीच मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९) कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सोमवारी (दि. ४) मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्या दोन्ही गुन्हेगारांविरुद्ध मोक्का लागला आहे. याबाबत सोमवारी पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

श्रीकांत सुधाकरराव ढोके (३०) आणि आकाश हरिश्चंद्र गायगोले (१९, दोघेही रा. लोणी, ता. नांदगाव खंडेश्वर) यांच्याविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. श्रीकांत ढोके आकाश गायगोले यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील लोणी, आसेगाव तसेच पोलिस आयुक्तालयात राजापेठ, बडनेरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत या पोलिस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, २९ मे २०१६ ला लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या होटेल आतिथ्य समोर नवी वस्ती बडनेरा येथे राहणारे अमित मदनगोपाल यादव (३०) त्यांचे मित्र किशोर भोयर, निखिल माहुरे हे दुचाकीने जात होते. त्या वेळी श्रीकांत ढोके आकाश गायगोले या दोघांनी त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली, त्यांनी नकार दिला असता त्यांच्यावर चाकू, तलवारने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात लोणी पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्पूर्वी, या दोघांविरुद्ध वाटमारी, मंगळसूत्र चोरी यासारखे गुन्हे दाखल होतेच. त्यामुळेच पोलिस अधीक्षकांनी या दोघांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला आज मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहे.

पोलिस अधीक्षकांनी या वर्षात केलेली ही तिसरी मोक्का कारवाई आहे. यापूर्वी दोन प्रकरणांत दरोडेखोर जबरी चोऱ्या करणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आलेला आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या इतिहासातील मोक्का कारवाई यंदा पहिल्यांदाच झाल्या आहे, हे विशेष.

शांतता कायम राखण्यासाठी कारवाई आवश्यक
समाजात शांतता सुव्यवस्था कायम ठेवणे तसेच जनसामान्यांच्या मालमत्तेचे जीविताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सदर गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे मोक्का कारवाई करण्यात आली आहे. लक्मीगौतम, पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...