आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या वादातून लहान भावाचा दगडाने ठेचून खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आरोपीने खुनासाठी वापरलेला दगड दाखवताना दिग्रस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांसह इतर कर्मचारी. )
दिग्रस- शेती मक्त्याच्या पैशाचा वाद इतका विकोपाला गेला की, मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवार, १० जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खंडापूर येथे घडली. बाळू राठोड असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी दिग्रस पोलिसंानी आराेपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील खंडापूर येथे बाळू श्रीराम राठोड विनोद श्रीराम राठोड हे दोघे भाऊ राहत होते. त्यांची वडिलोपार्जित जमीन पडीत राहू नये म्हणून गावात राहणाऱ्या त्यांच्याआईने ही जमीन गावातीलच एका जणाला मक्त्याने दिली होती. या शेतीचा मक्ता तीन हजार रुपये संबंधितांनी जमीन मालकाला दिला. दरम्यान, याची माहिती बाळू श्रीराम राठोड (वय ३६) यांना मिळाली. त्यावरून बाळूने आपल्या आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा मोठा भाऊ विनोद श्रीराम राठोड (वय ४०) याने ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दर्शवला त्यावरुन दोघा भावांमध्ये वाद झाला. बोलताबोलता हा पैशाचा वाद इतका विकोपाला पोहोचला की दारूच्या नशेत असलेला लहान भाऊ ऐकत नसल्याने शेवटी मोठ्या भावाने जवळच असलेल्या घराच्या टिनावरील दगड हातात घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जुमानल्याने रागाच्या भरात चक्क त्याच्या डोक्यात दगड घातला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली तेव्हा पोलिस पाटील गजानन राठोड यांनी दिग्रस पोलिस स्टेशनला माहिती दिली आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना भराडे, दिग्रस पोलिस निरीक्षक संजय पुजलवार, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश दंदे, रमेश वीर, रूपेश चव्हाण, संतोष चव्हाण यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. या घटनेची फिर्याद पोलिस पाटील गजानन राठोड याने दिली. फिर्यादीवरून आरोपी विनोद राठोड याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून हत्येसाठी वापरण्यात आलेला रक्ताने माखलेला दगड जप्त केला. तसेच पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह दिग्रस ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मृतक बाळू याची पत्नी काही वर्षांपूर्वी विष प्राशन केल्याने मरण पावली होती. मृतकाच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी दिग्रस पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास दिग्रस पोलिस हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...