आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परतीच्या पावसामुळे जोमदार आलेल्या सोयाबीनचे शेतामध्येच निघाले ‘तेल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील दोन वर्षे पावसाअभावी सोयाबीनच्या पिकाने शेतकऱ्यांना ‘अर्थ’हीन केल्यानंतर यावर्षी समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जोमदार आलेल्या सोयाबीन, उडीदाचे पीक सध्या परतीच्या पावसाने मातीत घातले आहे. शनिवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या समस्येवर कळस चढविला. दरम्यान, वऱ्हा (ता. तिवसा) (दि. ८) शिवारात दुपारच्या सुमारास वीज कोसळून रुपेश संजय बेलसरे (वय २८) रवींद्र अंबादास वानखडे (वय ४५) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात शेतकऱ्यांची खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळे एकीकडे कमी खर्चाचे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनच्या पिकाकडे वळला आहे. सातत्याने मागील दोन वर्षे पावसाअभावी सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्यामुळे जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनसह शेतकऱ्यांनी उडीदाची पेरणी केली होती. मागील दोन वर्ष सातत्याने उडीदाचे दरही सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन उडीदाचे पिकही जोमदार आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. सध्या सोयाबीन उडीदाचे पिके कापणीला आले आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांनी दोन्ही पिकांची कापणी करून ठेवली आहे. त्यातच मागील आठवड्याभरापासून परतीच्या पावसाने सोयाबीन उडीदाचे पिक मातीमोल झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या चांगल्या भावाच्या आशा मावळल्या आहेत. अंतिम टप्प्यात आलेले सोयाबीनच्या शेंगा झाडावरच अंकुरल्या असून कापणी झालेले सोयाबीनलाही अंकुर फुटले आहेत. किमान सात हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव असलेला उडीदही शेतातच कुजण्याच्या मार्गावर अाहे. दरम्यान, जिल्ह्यात अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने कापणी केलेले सोयाबीन उडीद मातीमोल झाले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा दिवाळी-दसऱ्याचा आनंद प्रामुख्याने सोयाबीनच्या पिकावर अवलंबून असतो. यंदा दिवाळी-आनंद हिरावून घेतला असल्याचे चित्र आहे.

परतवाड्यात डीपीवर कोसळली वीज
परतवाडा येथे शनिवारी आलेल्या मुसळधार पावसादरम्यान दुपारच्या सुमारास आठवडी बाजारातील डीपीवर वीज कोसळल्याने परिसरातली विद्युत उपकरणे जळाली. यामुळे परिसरातील वातावरण काही काळ भीतीच्या सावटाखाली आले हाेते. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...