आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख भाविकांनी घेतला कुलस्वामिनी दर्शनाचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी. नवरात्रोत्सवात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या पवित्र दिनी अंबानगरीचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री अंबादेवी एकवीरा देवींच्या दर्शनाला लाखो भाविकांचा जनसागर उमळला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।। देवीला शरण गेल्यास तसेच केवळ दर्शन केल्याने सर्व मंगल होते या धारणेमुळे अष्टमीला दिवसभरात सकाळी ते रात्री उशिरापर्यंत सुमारे लक्ष भाविकांनी कुलस्वामिनीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती श्री अंबादेवी संस्थानाचे विश्वस्त डाॅ. जयंत पांढरीकर यांनी दिली.
दिवसभर पाऊस नसल्यामुळे अचानक भक्तांचा सागर उमळला. त्यामुळे पुरुषांची रांग ही गांधीचौकाच्या पलीकडे तर महिलांची रांग ही अंबागेटच्या आतपर्यंत होती. याशिवाय सप्तमीला पाऊस असल्यामुळे हा दिवस वगळता दररोज सुमारे ५० ते ८० हजार भक्तांनी दोन्ही देवीचे दर्शन घेतले. राजकमल चौकापासूनच संपूर्ण रस्ता हा अष्टमीला गर्दीने फुलून गेला होता. तेथून अगदी कासवतीने भक्तांना पुढे सरकावे लागत होते. दर्शनासाठी मंदिर प्रशासन पोलिसांतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली. कोणीही रांग तोडू नये याची स्वयंसेवकांद्वारे काळजी घेतली जात होती. व्हीआयपींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. पुरुष महिलांचा मंदिरात येण्याचा बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असल्यामुळे सर्वांना देवींचे अगदी व्यवस्थित दर्शन होत होते.

विशेष बाब म्हणजे राजकमल चौकापासून ते गांधी चौकापर्यंत रहदारी बंद करण्यात आल्यामुळे या मार्गाने पायदळ जाणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. त्याचप्रमाणे रविनगरकडून येणाऱ्या भाविकांना भुतेश्वर चौकाच्या अलीकडेच वाहने ठेवून पायी मंदिरापर्यंत जावे लागले. राजकमल चौकाकडून येणाऱ्या भाविकांसाठी ओसवाल भवन येथे वाहनतळावर वाहने ठेवून तेथून पायी पुढे जावे लागले. तर मुख्य डाकघराकडून गांधीचौकाकडे येणारा पूर्ण रस्ताच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे मंदिर परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य झाले.पावसाने उसंत दिल्यामुळे हवेत सुखद गारवा, प्रसन्न वातावरण आणि जत्रेमुळे भाविकांच्या आनंदात चांगलीच भर पडली. दर्शनानंतर उपवासाचे खाद्य पदार्थ, प्रसादाचा आस्वाद भाविकांनी घेतला. उपवास होता त्यांनी उपवासाचे पदार्थ ग्रहण केले.

श्री एकवीरा देवी
विद्युत रोशनाईचे छत : मंदिराकडेजाणारे रस्ते विद्युत दिव्यांच्या नयनरम्य रोशनाईने असे काही सजवण्यात आले आहे की, आपण विजेच्या विविधरंगी छताखालून जात आहोत, असे वाटते. मंदिरावर देखणी विद्युत रोषणाई तसेच राजकमल, राजापेठ भुतेश्वर चौकात उभारण्यात आलेल्या भव्य द्वारांवर विविधरंगी विजेच्या माळा भाविकांची दृष्टी सुखावत आहेत.

रांगाेळी पुस्तकांच्या स्टाॅलवर गर्दी कमी
विविधवस्तुंच्या तुलनेत रांगाेळी पुस्तकांच्या स्टाॅलवर मात्र भाविकांची खरेदीसाठी यंदा फारशी गर्दी दिसली नाही. एखाद दुसरा ग्राहक एवढ्या गर्दीतही या दुकानांकडे फिरकत होता. त्यातही प्रासंगिक सप्तशती पाठ किंवा आरत्यांच्याच पुस्तकांची भक्तांद्वारे खरेदी होत होती. अंगण सजवण्यासाठी रांगोळ्यांची मोठया प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र पाऊस अद्याप कमी झाला नसल्यामुळे भाविकांचा रांगाेळी खरेदी करण्यात रस नसल्यामुळे त्यांची फारशी विक्री होताना दिसली नाही.
-------------------------
बातम्या आणखी आहेत...