आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीओपी गणेशमूर्तींच्या लगद्यापासून नागपुरात सायकल ट्रॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- व्यापक जनजागृती केल्यानंतरही अनेक भाविकांनी पीओपी गणेशमूर्तींची स्थापना केली. या मूर्ती विरघळत नसल्यामुळे रसायनाच्या पाण्यात त्याचे विसर्जन करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला हाेता. त्यासाठी ‘नीरी’चे सहकार्य घेण्यात अाले. या मूर्ती विरघळल्यानंतर त्या लगद्यापासून सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यासाठीचा आर्थिक भार महापालिका उचलणार अाहे.  

नागपूरमध्ये  मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरात तब्बल २ लाख ७ हजार मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मूर्ती पीओपी होत्या. त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे रसायनाच्या पाण्यात विसर्जन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेचे (नीरी) सहकार्य घेण्यात आले. सक्करदरा तलाव येथील सेंट्रिंग टँकमध्ये पीओपी मूर्तीचे रसायनमिश्रित पाण्यात विसर्जन करण्यात आले. अन्य ठिकाणीही अशा प्रकारे विसर्जन केले. पाण्यामध्ये अमोनियम बायकार्बोनेट मिसळल्यानंतर त्यात पीओपी मूर्ती पूर्णत: विरघळते. त्यातून कॅल्शियम काबोर्नेट व अमोनियम सल्फेट अशी दोन रसायने तयार होतात. कॅल्शियम काबोर्नेटचा उपयोग बांधकामात होतो, तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून करता येतो. उपरोक्त रसायने मिसळल्यानंतर लगदा तयार होण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी लागतो. हा लगदाच ट्रॅक तयार करण्यासाठी वापरला जाईल.  

असा असेल ट्रॅक  
पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर तयार होणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून नागपुरात नीरी परिसरात सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. नीरीच्या मुख्य द्वारापासून वसंतनगरमार्गे दीक्षाभूमीपर्यंत हा सायकल ट्रॅक राहील, तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून नीरी परिसरात असलेल्या झाडांसाठी करण्यात येणार आहे.

असा आहे खर्च  
एका सेंट्रिंग टँकमध्ये २५ हजार लिटर पाणी असते. यात १९० बॅग अमोनियम बायकार्बोनेट मिसळावे लागते. अमोनियम बायकार्बोनेटची एक बॅग २५ किलोची असून त्याची किंमत ७०० रुपये आहे. १९० बॅगचा खर्च १ लाख ३३ हजार इतका होतो. शिवाय टँकमधील माती काढण्यासाठी पोकलेनचा वापर केला तर टँक फुटण्याचा धोका असल्यामुळे मनुष्यबळाचा वापर केला जाईल. त्याचाही खर्च वेगळा येईल.  
बातम्या आणखी आहेत...