अमरावती - मागील साडेसहा महिन्यांपासून अमरावतीचे पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले राजकुमार व्हटकर यांची बुधवारी पदोन्नतीवर मुंबईला बदली झाली असून, त्यांच्या जागेवर नवीन पोलिस आयुक्त म्हणून दत्तात्रय मंडलिक येणार आहेत. २८ वर्षांच्या पोलिस सेवेत मंडलिक पहिल्यांदाच विदर्भात येत आहेत. बुधवारी राज्यातील सात ते आठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अमरावतीचे पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची पोलिस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण समिती, मुंबई येथे तर गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे येथे कार्यरत दत्तात्रय मंडलिक यांना अमरावतीचे सीपी म्हणून पदोन्नतीवर पाठवण्यात आले आहे. राजकुमार व्हटकर आणि मंडलिक यांना ३१ डिसेंबरला पदोन्नती िमळाली होती. मात्र, नवीन ठिकाणी पदस्थापना दिली नव्हती. मंडलिक हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असून, १९८८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून ते पोलिस दलात दाखल झाले. दरम्यान, १४ वर्षांच्या सेवेनंतर २००२ मध्ये त्यांना आयपीएस (भारतीय पोलिस सेवा) केडर मिळाले. मंडलिक यांनी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, ठाणे या भागात सेवा दिली आहे.
दोनवर्षांचा कालावधी करू शकतात पूर्ण: अमरावतीचेआयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. जुलै २०१२ मध्ये ते बदलून गेले. त्यानंतर आलेला एकही अधिकारी मागील साडेतीन वर्षांत आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. अमितेश कुमार यांच्यानंतर अजित पाटील आले, त्यांची १८ महिन्यांत बदली झाली. त्यानंतर डॉ. सुरेश मेकला आले, त्यांची १३ महिन्यांत पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर राजकुमार व्हटकर आले, त्यांचीसुद्धा साडेसहा महिन्यांमध्येच बदली झाली. आता दत्तात्रय मंडलिक हे पदोन्नतीवर येत असल्याने एकाच ठिकाणी काम करण्यासाठी मिळणारा दोन वर्षांचा कालावधी ते पूर्ण करू शकतील.
उद्याचयेण्याची शक्यता : दत्तात्रयमंडलिक हे सध्या पुण्याला कार्यरत आहेत. मात्र, उद्याच (दि. १५) अमरावतीत येऊन सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. काही कारणांस्तव १५ ला नाही पोहोचलो तर १७ जानेवारीला कार्यभार स्वीकारणार असल्याचे दत्तात्रय मंडलिक यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
एसीपी शिरीष राठोड यांची नागपुरात बदली : येथीलपोलिस आयुक्तालयात मागील चार वर्षांपासून कार्यरत शिरीष राठोड यांना दहा दिवसांपूर्वी एसीपी म्हणून पदोन्नती मिळाली होती. त्यांना शहर वाहतूक शाखेचा प्रभारही सोपवण्यात आला होता. मात्र, बुधवारी त्यांची नागपूर शहर येथे बदली झाली आहे. राठोड यांच्या बदलीमुळे अमरावती शहर पोलिस दलात रिक्त झालेल्या एसीपी पदावर बुधवारी रात्रीपर्यंत नवीन एसीपी कोण येणार हे कळले नव्हते.