आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीनंतरच्या 'रांगमृत्यूं’ना विधान परिषदेने वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : चलनबंदीनंतर देशभरातल्या बँका आणि एटीएम केंद्रांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या. बऱ्याच वेळ या रांगांमध्ये थांबल्याने देशभरात ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा बुधवारी विधान परिषदेत करण्यात आला. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्याची सूचना विरोधकांनी केली.
त्यास सत्ताधारी पक्षांनी साथ दिली. त्यामुळे चलनबंदीदरम्यान मृत्यू झालेल्या नागरिकांना महाराष्ट्राच्या विधान परिषदेने काही क्षण उभे राहत शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली. बुधवारी सकाळी विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास अपेक्षित होता. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीने हा तास रद्द करून नोटाबंदीवर चर्चा घेण्याची मागणी केली.
“नोटाबंदीपेक्षा दुसरा कोणताही विषय सध्या राज्यात मोठा असू शकत नाही,’ असे नारायण राणे म्हणाले. त्यावर भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेत मराठा आरक्षणाची चर्चा त्याहून महत्त्वाचे असल्याचा आग्रह धरला. चर्चा घ्यायची की नाही, या मुद्द्यावरून झालेल्या
गोंधळात विधान परिषदेचा सुमारे तासभर वाया गेला.
अखेरीस सभापती रामराजे निंबाळकर यांनी नोटाबंदीवर चर्चा करण्याची अनुमती दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटाबंदीवरील चर्चा सुरू केली. मुंडे म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय लागू केला की सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी, हा प्रश्न आहे. केंद्राच्या निर्णयामुळे लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
नोटाबंदीमुळे स्वतःचे पैसे असून लोकांना वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. रांगांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसंदर्भात सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्न त्यांनी केला.
नोटाबंदीमुळे राज्यातला किती काळा पैसा बाहेर आला, याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली. “यंदा पाऊस चांगला झाला. पिके चांगली आली. मात्र, नव्याने आलेल्या चलन दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले.
कापूस, सोयाबीन, फळांना उठाव नसून भाव पडले आहेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, सामान्य व्यापारी, लघु उद्योजकांचे वीस हजार कोटींचे नुकसान झाले. त्याची भरपाई सरकार करणार का,’ असे मुंडे यांनी विचारले. “काळ्या पैशाविरोधातील मोहिमेमुळे भ्रष्टाचाऱ्यांची झोप उडाली आहे. प्रामाणिक माणूस सुखाची झोप घेत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथातून मोठ्या नोटा चलनात असू नयेत, हे ऐंशी वर्षांपूर्वी सांगितले,’ असे भाजपचे भाई गिरकर म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री
नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे १५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा विरोधी पक्षाच्या दाव्यात दम नाही. त्यांची आकडेवारी बरोबर आहे, असे माझे मत नाही. तरी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कधीही हात अाखडता घेणार नाही.
नोटांबदी आधीची आणि नोटाबंदीनंतरच्या पेरण्यांची सविस्तर आकडेवारी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...