आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात संस्कृत अकादमी स्थापन करणार - देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रात संस्कृत भाषेचा प्रचार व प्रचारासाठी संस्कृत अकादमी स्थापन करण्याची राज्य शासनाची योजना असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली.

रेशीमबाग येथे संस्कृत भारतीच्या संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कामत, संस्कृत भारतीचे प्रचार-प्रसार प्रमुख श्री. श. देवपुजारी, प्रांत मंत्री संजय लाभे, महानगर अध्यक्ष मधुसूदन पेन्ना, विजय पल्लेवार व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील प्रत्येक विभागात संस्कृत भाषेचे बी.एड. महाविद्यालय सुरू करण्याच्या घोषणेचा उल्लेख करून कालिदास विद्यापीठाचा विस्तारासाठी राज्य शासन आर्थिक पाठबळ देईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी जाहीर केले. संस्कृत ही ज्ञानभाषा असल्याने या भाषेचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचे प्रयत्न होतील. त्यासाठी धोरण निश्चित केले जाणार असून भाषेच्या प्रचार व प्रचारासाठी संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहाव्या वर्गापासून संस्कृत भाषा अनिवार्य करावी, संस्कृतच्या पाठ्यक्रमाची पुनर्रचना करावी, संस्कृत माध्यमातून संस्कृत शिकविले जावे, वेद व शास्त्र शिक्षण ज्या गुरुकुलांमध्ये सुरू आहे त्यांना शासनातर्फे अनुदान मिळावे, आदी मागण्या संमेलनात करण्यात आल्या.

कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरु श्रीमती उमा वैद्य यांचे भाषण झाले. याप्रसंगी श्रीमती लीना रस्तोगी, चंद्रगुप्त वर्णेकर, संपदा श्रीपाद म्हाळगी, आभा भीमनवार यांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...