आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीक्षाभूमीवर ११ आॅक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन; गुरुवारपासून साहित्य संमेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दीक्षाभूमी येथे ११ आॅक्टोबरला साठवा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी पत्र परिषदेत दिली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवीद, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आदींची प्रमुख उपस्थिती राहील. या वेळी विजय चिकाटे, एन. आर. सुटे, विलास गजघाटे आदी उपस्थित होते.

दीक्षाभूमीवर बौद्ध प्रशिक्षण केंद्र
चौफेर विकास करण्याच्या दृष्टीने दीक्षाभूमीवर विविध बांधकामे करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात येथे बौद्ध प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती विलास गजघाटे यांनी दिली. दीक्षाभूमी ही दीक्षाभूमीच राहील. येथून बाबासाहेबांचा विचारच तेजाने तळपेल, असे गजघाटे म्हणाले.

गुरुवारपासून साहित्य संमेलन
सहा आॅक्टोबरपासून दीक्षाभूमीवर दाेन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने चर्चा, परिसंवाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद‌्घाटन गुरुवारी सकाळी १० वाजता होईल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेचा समाजजीवनावरील परिणाम, भारतीय साहित्य-संस्कृतीच्या विकासात बौद्ध विचारवंत, प्रवासी व सम्राटांचे योगदान, विविध भाषांतील बौद्ध साहित्य आदी विषयांवर परिसंवादांचे आयोजन केले आहे. या शिवाय ८ आॅक्टोबरला ‘धर्मातरानंतरचा महिला विकास’ या विषयावर महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजकारण्यांचा वावर नको
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित सर्व कार्यक्रम धार्मिक स्वरूपाचे असल्याने या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींचा वावर नको, अशी भूमिका घेत समता सैनिक दलाने स्मारक समितीला तसे पत्रही दिले. मात्र कार्यक्रमाला उपस्थित सर्वजण शासनाचे प्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षांचे नाही, असे सदस्य विजय चिकाटे यांनी स्पष्ट केले. तर पुढील वर्षीपासून महाराष्ट्रासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच धम्म गुरूंना आमंत्रित करण्यात येईल, असे विलास गजघाटे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...