आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगाव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; झाडे कोसळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे: शहरासह तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. वाठोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचन शेडवर झाड कोसळल्याने किचन शेडचे नुकसान झाले. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने जीवित हानी टळली. सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. तालुक्यात शेतकऱ्यांचे भुईमुगाचे पिक काढणे सुरू असल्याने त्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी वीजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागत नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. शाळेच्या किचन शेडवर झाड कोसळल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक केशव पोटे यांनी प्रशासनाला दिली. 
 
रविवारी सायंकाळी शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्याचे तांडव सुरू होते. सुमारे पाऊण तास वादळी वाऱ्याने थैमान घातल्यानंतर शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. नागरिकांना होणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेकांना झालेल्या नुकसानाचा सामना करावा लागला. वादळी पावसामुळे तालुक्यात कुठेही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.पावसामुळे मात्र वातावरणात गारवा जाणवत आहे.  
 
लोणी येथे कोसळले विजेचे खांब, टिनपत्रे उडाली 
लोणी येथे रविवारी सायंकाळी वादळी पावसामुळे नागरिकांना नुकसानाचा सामना करावा लागला. मात्र आलेल्या या पावसामुळे शेतकरी पेचात पडला आहे. पावसामुळे शेतकरी नागरिकांची हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. परिसरातील काही घरांवरील टिनपत्रे उडाली, तर कुठे विजेचे खांब वाकल्याने वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला होता. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी भरपाईची मागणी केली आहे. वादळी पावसामुळे गावालगत असलेल्या उमेश अकर्ते यांच्या शेतातील झोपडीवरील टिनपत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. वरुड-लोणी मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. परिसरातील नागरिकांनी झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 
 
वाठोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाकगृहावर झाड कोसळल्याने असे नुकसान झाले.दुसऱ्या छायाचित्रात उमेश अकर्ते यांच्या शेतात असलेल्या शेडवरील टिनपत्रे वाऱ्यामुळे उडाली. 
बातम्या आणखी आहेत...