आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमनी केला शुभारंभ, डिजिटल गावे लगेच ऑफलाइन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपूरला राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून नवी ओळख देण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी महाराष्ट्रदिनी जिल्ह्यातील पाच डिजिटल गावांचा शुभारंभ झटपट उरकण्यात आला. मुंबईहून मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यामुळे गावकरी हरखून गेले. मोबाइलवर मोफत वायफायचे सिग्नल पाहून सर्वांत खुश झाली ती गावांतील तरुण मंडळी... पण हा आनंद औटघटकेचा ठरला. शुभारंभाची औपचारिकता आटोपताच दोनच तासांत डिजिटल गावे चक्क ऑफलाइन झाली. आता यावर सरकारी यंत्रणांकडून टोलवाटोलवी सुरू आहे.

नागपूर जिल्ह्यातील ७७६ गावे येत्या ऑगस्टपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याची राज्य शासनाची योजना आहे. त्याची सुरुवात म्हणून जिल्ह्यातील विहीरगाव, खसाळा, खंडाळा, तरोडी (बुद्रुक) आणि दाभा ही पाच गावे डिजिटल करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी पार पडला. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे या समारंभात मुंबईहून ऑनलाइन सहभागी होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी तरोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर खसाळा येथील रुग्णांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्हिडिओकॉलद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन केले. यानिमित्ताने पाचही गावांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

वायफाय सिग्नल मोबाइलवर मोफत उपलब्ध झाल्याने तरुण मंडळी जाम खुश होती. मात्र, त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकला. शुभारंभाचा कार्यक्रम आटोपला आणि दीड दोन तासातच नेटवर्क बंद पडले. हे वास्तव जाणून घेण्यासाठी गुरुवारी (पाच दिवसानंतर) नागपूरला लागून असलेल्या विहीरगाव आणि तरोडी (बुद्रुक) या दोन गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी वेगळेच दिसले. दोन्ही गावांमध्ये सिग्नल्सचा पत्ता नव्हता. विहिरगाव येथे चौकशी केल्यावर कळले की, उद््घाटनानंतर दोन तासातच सिग्नल बंद पडले.

दुरुपयोगाचीही चिंता
गाव डिजिटल झाले तर त्याचा आम्हाला फायदाच होईल. प्रमाणपत्रे देण्याचे काम सोपे होईल. शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल. रुग्णांनाही तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेऊन उपचार करता येतील. विद्यार्थ्यांसाठी ई-वर्ग घेऊन त्यांच्यात सुधारणा घडवता येईल. हा लाभ होणार असला तरी तरुण मंडळी मोफत वायफाय मिळाल्यावर दुरुपयोगही करतील, अशी चिंता कापसे यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी व्यग्र!
कामठी तालुक्यातील तरोडीतील (बुद्रुक) परिस्थिती वेगळी नाही. तेथेही दोन तासात बंद पडलेले नेटवर्क बंदच आहे. दुसरीकडे बीएसएनएलच्या लेखी आजही नेटवर्क सुरूच आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी व्यग्रतेचे कारण देत याबाबत बोलण्याचे टाळले. यंत्रणा सुसज्ज नसेल तर शुभारंभाचा खटाटोप का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

म्हणे मशीन गरम झाली!
विहीरगावचे सरपंच नारायणराव कापसे म्हणाले, "अहो, गावातील पोरे भंडावून सोडत आहेत सिग्नल केव्हा सुरू होणार म्हणून. रोज चकरा मारून सिग्नल आले का, अशी विचारणा करतात. बीएसएनएलचे अधिकारी मशीन गरम झाल्याचे सांगतात आठवडाभरापासून हेच सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...