आर्णी (जि. यवतमाळ)- लोकसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. निवडणुकीदरम्यान मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी विकासाची स्वप्ने दाखवली चहा विकणाऱ्या सामान्य माणसाला देशाचा पंतप्रधान बनवा, तुमचा सर्व विकास करेल, असे लबाड बोलून मोदी पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर जनतेला विसरून त्यांचे स्वप्न भंगवले, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी उडवली.
आर्णी (जि. यवतमाळ) येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘चाय की चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार राज बब्बर, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा बार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार हरिभाऊ राठोड आयोजक माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते.
दिग्विजय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की, मी चहा विकला. मात्र, मोदी यांना चहा विकताना कुणी पाहिले का? जर कुणी पाहिले असेल, तर त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, काँग्रेसकडून सांगणाऱ्यांना दोन लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. लबाड बोलणारा माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसत असेल तर काय विकास होणार आहे. नरेंद्र मोदी प्रचारादरम्यान सांगत होते की, शंभर दिवसांत देशात काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करू. अजून शंभर दिवस झाले नाहीत का, असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमाला आठ ते दहा हजार नागरिकांनी हजेरी लावली.
भाजप झुठी जनता पार्टी
मोदीसरकार फक्त उद्योगपतींचे आहे. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उद्योगपतींना लाख १४ हजार काेटी रुपये माफ केले. मात्र, दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना फुटकी कवडी देता येत नाही. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांकडे साधी भेट द्यायला वेळ नाही. दोन वर्षांत जनतेने या सरकारला पूर्णपणे ओळखले आहे. भारतीय जनता पार्टी नसून झुठी जनता पार्टी असल्याची टीकाही दिग्विजय सिंग यांनी केली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)