आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. चा १३ कोटी रुपये उत्पन्नाचा अर्थसंकल्प सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हापरिषदेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प गुरूवारी सादर करण्यात आला. दरम्यान, २०१६-१७ या आर्थिक वर्षात १३ कोटी २९ लक्ष ७७ हजार रुपयांचे मूळ उत्पन्नाचे अंदाजपत्रक सादर करून यात अपंगांसाठी २० लाख रुपयांच्या निधीची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष वित्त-आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हाडोळे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०१५-१६ च्या सुधारीत अंदाजपत्रकानुसार एकूण महसुली उत्पन्न १८ कोटी ४३ लाख ७४ हजार ५३० होते. २०१६-१७ च्या अंदाजपत्रकीय मूळ उत्पन्न १३ कोटी २९ लाख ७७ हजार रुपये ठरविण्यात आले आहे. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी एक कोटी ३० लाख हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपंगाच्या कल्याणासाठी एकुण उत्पन्नाच्या तीन टक्के निधी खर्च करावयाचा असल्याने त्यानुसार यावर्षी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला बालकल्याणासाठी ७७ लाख ६१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून कृषी क्षेत्रासाठी एक कोटी ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी तालुकास्तरावरील काही जागांवर खासगी कार्यक्रम राबविण्यात येत असल्यास त्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

तासाभरातच आटोपला वार्षिक अर्थसंकल्प
जिल्हापरिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या सुमारे १९९६ गावातील सुमारे १८ लाख ५१ हजार १५८ नागरिकांशी निगडीत असलेल्या अर्थसंकल्पाची सभा तासाभरातच आटोपण्यात आली. ग्रामीण भागाच्या विकासाच्या या अर्थसंकल्पात केवळ सात ते आठ सदस्यांनी जुजबी प्रश्न विचारले. अर्थसंकल्पावर फारशी चर्चाच झाल्याने ही सभा तासाभरातच आटोपण्यात आली. यामुळे अर्थसंकल्पाबाबत सदस्यांकडे प्रश्नच नव्हते कि मुळात अर्थसंकल्पाबाबत सदस्यांमध्ये ज्ञान नव्हते असे चित्र आजच्या सभेत दिसून आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे हार बदलवा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष साजरे करण्यात येत आहे. परंतु सभागृहातील या दोन्ही महान महापुरूषांच्या प्रतिमेचे हार जुनेच असल्यामुळे ते बदलण्यात यावे अशी मागणी सुरेखा ठाकरे यांनी सभागृहात केली.

बांधकाम विभागांवरच सर्वाधिक तरतूद
अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक रकमेची तरतूद बांधकाम विभागावर करण्यात आली आहे. त्यामुळे इतर विभागावर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात कृषी क्षेत्राची अवस्था बिकट असतानाही कृषी विभागावरही अल्प तरतुद करण्यात आली आहे. यात भरीव वाढ केली असती तर अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकला असता असे प्रताप अभ्यंकर यांनी सांगितले.

पुरस्काराची रक्कम तोकडी
अर्थसंकल्पात आदिवासी विभागातील शाळा दुरूस्तीची तरतूद करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या हजार रुपयांच्या पुरस्काराची रक्कम तोकडी असल्यामुळे यात वाढ करण्यात यावी अशी मागणी सदस्य श्रीपाल पाल यांनी केली.

शिलाई मशीन सहा की दहा हजारांची?
समाज कल्याण विभागाने सहा हजार रुपये किंमत असलेल्या शिलाई मशीन दहा हजार रुपयांत खरेदी केल्याची तक्रार आली असल्याची माहिती माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, मशीन स्थानिक पातळीवर खरेदी करण्याची तरतूद असताना त्या थायलंडच्या कंपनीकडून खरेदी केल्या असल्याचे त्या म्हणाल्या. यात नेमकी चौकशी करण्यात येऊन तथ्य सभागृहात मांडण्यात यावे अशी मागणी ठाकरे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...